सुनिल माळी, प्रतिनिधी
पारोळा, 9 मे : येथील राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयाच्या चार महिला खेळाडूंची अखिल भारतीय आंतर विद्यापीठ नेटबॉल स्पर्धेसाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संघात निवड करण्यात आली आहे. त्यात अर्चना पाटील (पळासखेडे), ज्योती पाटील (चोरवड), माधुरी चौधरी, (पारोळा), तेजल पाटील (भोंडण) यांची कालिकत विद्यापीठ, कालिकत येथे होणाऱ्या या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
नेटबॉल या खेळात राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयाच्या गेल्या सात ते आठ वर्षांपासून एरंडोल विभागामध्ये नेहमी वर्चस्व आहे. या खेळाडूंना क्रीडा संचालक डॉ. संजय भावसार यांचे मार्गदर्शन लाभले. चारही महिला खेळाडूंची निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार वसंतराव मोरे, महाविद्यालयाचे सचिव पराग मोरे, प्रशासकीय अधिकारी अॅड. रोहन मोरे, प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील, उपप्राचार्य डॉ. गोकूळ बोरसे, उपप्राचार्य डॉ. अजय पाटील यांनी कौतुक केले. या खेळाडूंनी या आधी विद्यापीठाच्या एरंडोल विभागाकडून खेळताना विद्यापीठाच्या आंतरविभागीय स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती.