जळगाव, 25 ऑगस्ट : जळगाव शहरातील शनिपेठ पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत मोटारसायकल चोरी प्रकरणाचा छडा लावला आहे. तसेच या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून चोरी करण्यात आलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
काय आहे संपूर्ण घटना –
14 ऑगस्ट 2025 रोजी बजाज पल्सर N 160 मोटार सायकल चोरीचा गुन्हा शनिपेठ पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्ह्याचा तपास पोनिसो श्रीमती कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ प्रदिप नन्नवरे सह शनिपेठ पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकातील कर्मचारी पोहेकॉ शशिकांत पाटील, तसेच पो. अंमलदार/निलेश घुगे, रविंद्र तायडे, पराग दुसाने, अमोल वंजारी, गणेश ढाकणे हे करीत होते.
तपासादरम्यान संशयित आरोपी हा भुसावळ शहरातील पापानगर, ईराणी मोहल्ला येथे बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीत वास्तव्यास असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी भुसावळ येथे जावुन बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे पत्रव्यावहार करुन स्थानिक पोलिसांची मदत घेवुन आरोपीचा शोध घेण्यात आला.
भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ तसेच गुन्हे अन्वेषण पथकातील पोहेकॉ/ रवी नेरकर, पो. अंमलदार/प्रशांत सोनार, सचिन चौधरी यांच्या सहकार्याने सदर आरोपीचा शोध घेण्यात आला. तपासादरम्यान आरोपीकडुन चोरीस गेलेली मोटारसायकल भुसावळ शहरातुन जप्त करण्यात आलेली आहे.
हद्दपारी आदेशाचे उल्लंघन करणारे आरोपी ताब्यात –
शनिपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील राहणारे गुन्हेगारी प्रवृत्तीचा आरोपी नामे सागर ऊर्फ झंपऱ्या आनंदा सपकाळे (वय- 32, रा. बालाजी मंदीर मागे कोळीपेठ जळगाव) यास पोलीस अधीक्षक यांनी प्रचलित कायद्यानुसार ठराविक कालावधीसाठी जिल्ह्यातुन हद्दपार केले होते.
दरम्यान, 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी भिलपुरा चौक याठिकाणी पोस्टे हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना खात्रीलायक गोपनीय बातमीदारामार्फत विश्वसनीय माहिती पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना प्राप्त झाली की सागर ऊर्फ झंपऱ्या हा कोणतेही वैध कारण किंवा कायदेशीर परवानगी न घेता आपल्या राहत्या घरी वास्तव्य करीत आहे. मिळालेल्या बातमीची खात्री करण्यासाठी पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्यासह पोलीस अंमलदार अमोल वंजारी, पराग दुसाणे, निलेश घुगे, काजोल सोनवणे तात्काळ रवाना होवुन छापा टाकला असता आरोपी त्याच्या घरात मिळुन आले, त्यास ताब्यात घेवुन महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 142 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.