जळगाव, 26 जुलै : ‘सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूज‘चे मुख संपादक शशिकांत दुसाने यांची श्रमिक आधार पत्रकार संघ (महाराष्ट्र राज्य) संघाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष दिलीप मोहिते यांच्या आदेशाचे नियुक्तीपत्र त्यांना नुकतेच प्राप्त झाले आहे.
शशिकांत दुसाने यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती –
शशिकांत दुसाने यांना प्राप्त झालेल्या पत्रात नमूद केल्यानुसार, श्रमिक आधार पत्रकार संघाच्या ‘महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष’ या पदावर आपली नियुक्ती करतांना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पत्रकारिता क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव बघता आपण पत्रकार संघ वाढीसाठी व गरजु दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर असाल, अशी आम्हाला खात्री आहे. आपल्या स्तरावर महाराष्ट्रातील सर्व तालुक्यांमध्ये कार्यकारणी तयार करुन नियुक्त्या कराव्यात, असेही त्या पत्रात म्हटले आहे.
शशिकांत दुसाने यांचा परिचय –
शशिकांत दुसाने हे पाचोरा तालुक्यातील लासगाव येथील रहिवासी असून मागील अनेक वर्षांपासून ते सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. समाजकार्यात असताना त्यांनी मानवाधिकार संघटनेच्या माध्यमातून अनेक विस्थापित, वंचित तसेच दुर्बल घटकांच्या न्याय व हक्कासाठी लढा दिला आहे. यानंतर जनहिताच्या मुद्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी तसेच सर्वसामान्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूज या डिजिटल माध्यमाची त्यांनी स्थापना केली.
दरम्यान, आतापर्यंत दुसाने यांनी केलेले सामाजिक कार्य तसेच सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजच्यावतीने करण्यात येत असलेली प्रभावी पत्राकारिता या दोघं बाबींची दखल घेत त्यांची श्रमिक आधार पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, दुसाने यांच्या नियुक्तीचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.