जळगाव, 24 सप्टेंबर : अमळनेर येथील मंगळ ग्रह मंदिराच्या विकासासाठी शिखर समितीने 25 कोटी रूपयांच्या आराखड्यास मान्यता दिली असून शेगाव मंदिराच्या धर्तीवर विकास करण्याच्या सुचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. आज, 24 सप्टेंबर रोजी सह्याद्री अतिथी गृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत अमळनेर येथील मंगळ ग्रह मंदिर विकासाच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या महत्वाच्या सूचना –
शिखर समितीच्या या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशातील एकमेव अशा मंगळ ग्रह मंदिराचा विकास शेगाव विकास आराखड्याच्या पाश्वभूमीवर करावा व हे काम करण्यासाठी अनुभवी वास्तुविशारदची नेमणूक करण्याच्या सूचना दिल्या. या ठिकाणी सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध होतील याची दक्षता घ्यावी असे सूचित केले. या कामासाठी तात्काळ शासन निर्णय काढून इ-निविदा करण्याबाबत निर्देश दिले. दरम्यान, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे यांनी या शिखर समिती समोर मंगळगृह मंदिराच्या आराखड्याचे सादरीकरण ठेवले होते.
यांची होती उपस्थिती –
शिखर समितीच्या या बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, खा. स्मिताताई वाघ, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार समाधान अवताडे, आमदार श्रीमती सरोज अहिरे राज्याच्या मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक आदी, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, ग्रामविकास विभागाचे सचिव एकनाथ डवले, पर्यटन विभागाच्या सचिव श्रीमती जयश्री भोज उपस्थित होते. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले.
हेही पाहा : Jalgaon जिल्ह्यातील एमरजन्सी लोडशेडिंग कधी बंद होणार?, IAS Ayush Prasad Exclusive Interview