मुंबई, 15 ऑक्टोबर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी विरोधकांनी निवडणूक आयोगाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडीसह मनसे आणि इतर विरोधी पक्षांचे शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयुक्त तसेच राज्य निवडणूक मुख्य अधिकाऱ्यांची काल आणि आज (14 व 15 ऑक्टोबर) रोजी भेट घेतली. यानंतर विरोधातील सर्व पक्षांच्या नेत्यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी त्यांची भूमिका स्पष्ठ केली.
उद्धव ठाकरे काय म्हणाले? –
दोन्ही निवडणूक आयुक्तांकडे आमचे म्हणणे मांडले असून केंद्रीय आयोगाच्या अधिकाऱ्यांनी स्थआनिक स्वराज्य संस्था हा राज्य निवडणूक आयोगाचा विषय असल्याचे सांगितले. तर, राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादी हा केंद्राचे विषय असल्याचे सांगितले. नेमके याचा बाप कोण आहे आणि याला जबबादर कोण आहे? कोणाचा कोणाला पत्ता नाही. निवडणूका घ्यायच्या म्हणून घेत आहेत आणि ही निवडणूक आयोगाची करप्ट प्रॅक्टीस आहे. दरम्यान, याबाबत आता त्यांना काय शिक्षा देणार? असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.
“….तोपर्यंत या निवडणुका होता कामा नये!” –
उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, आमच्याशी चर्चा सुरु असताना त्यांनी कालच निवडणुका जाहीर केल्या. मात्र, आम्ही त्यांना स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, जोपर्यंत मतदार यादीतील घोळ सुधारत नाहीत, तोपर्यंत या निवडणुका होता कामा नये. तसेच त्यावर सर्वोच्च न्यायालयाचा आदेश त्यांनी दाखवला.
View this post on Instagram
मात्र, सर्वोच्च न्यायालय असे कधीही सांगत नाही की, तुमच्यात काहीही दोष असतील तरी चालतील पण ठरलेल्या तारखेआधीच निवडणुका घ्या. निवडणुका सदोष असू नयेत आणि त्या पारदर्शक पद्धतीने व्हायल्या हव्यात, असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असल्याचे ठाकरे म्हणाले. दरम्यान, यावर दोन्ही आयुक्तांनी सकारात्मक विचार करतो, असे सांगितले. मात्र, आता सकारात्मक विचार करून चालणार नाही, आता अशा गोष्टी होता कामा नये.
निवडणूक निःष्पक्षपातीपणे झाली पाहिजे –
विधानसभा निवडणुकीत सत्ता चोरणाऱ्यांच्या चोरवाटा आता आम्ही अडवल्या आहेत. निवडणूक निःष्पक्षपातीपणे झाली पाहिजे, अन्यथा इलेक्शनपेक्षा सिलेक्शन करून मोकळे व्हा, अशा शब्दांत त्यांनी निवडणूक प्रक्रिया आणि मतदार यादीतील घोळावर उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे.
तसेच या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात तसेच मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी देखील मतदार याद्यांमधील घोळ पुराव्यासह दाखवत निवडणूक आयोगाच्या कामगिरीबाबत प्रश्नचिन्ह उठवले आहे. याप्रसंगी जितेंद्र आव्हाड, विजय वडेट्टीवार, अरविंद सावंत यांच्यासह महाविकास आघाडीतील नेते तसेच मनसे पदाधिकारी उपस्थित होते.






