जळगाव – जळगाव ग्रामीणमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी लगेचच अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टिका होत आहे. यातच आता शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, जळगाव ग्रामीणचे आमदार आणि माजी मंत्री गुलाबराव पाटील यांनी देवकर यांच्यावर निशाणा साधत जोरदार टिका केली आहे.
काय म्हणाले गुलाबराव पाटील –
माध्यमांशी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, निश्चितपणे त्यांना त्यांच्या पक्षातून हा विरोध होत आहे. ती त्यांच्या पक्षाची अंतर्गत बाब आहे. याचं कारण असं आहे की, ज्या कार्यकर्त्यांनी, अजून एक आठवडाही उलटत नाही, म्हणजे अहिराणी भाषेत म्हटलं तर, अजून दहावंही झालं नाही, तोपर्यंत पक्षांतर होत आहे. मला हसू या गोष्टीचं येत आहे की, आम्हाला गद्दार म्हणणाऱ्यांना आम्ही काय म्हणावं. ज्या 84 हजार लोकांनी तुम्हाला मते दिली, तुम्ही त्यांना 10 दिवस पण वाट बघू देत नाही, तोपर्यंत पक्षांतराची वाट पाहत आहात, त्यांना माहिती आहे की, त्यांचे दूध फेडरेशनचे भ्रष्टाचार आहे, त्यांचे बँकेचे भ्रष्टाचार आहेत, त्यांसोबत त्यांनी केलेल्या समस्या बाहेर येणार आहे, हे त्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे कुठल्यातरी सत्ताधारी पक्षात जायचं आणि आपला बचाव करावा.
आपली वारी थांबावी यासाठी –
मंत्रिमंडळ विस्तारानंतर मीच आता या सगळ्या गोष्टी पुढे काढणार आहे, हे त्यांना माहितीये आहे आणि त्यांचे जे मजूर फेडरेशन आहे, त्यांचे जे सगळे लोकं आहेत यांनी पैशांचा उन्माद या निवडणुकीत घातला, त्यामुळे उद्या प्रॉब्लेम होणार, हे त्यांना माहितीये. हे लोकं मजूर फेडरेशनचे खाऊन बसले आहेत. बँकेचे पैसे खाऊन बसले आहेत. अॅटलांटाची चौकशी यांच्या मागे लागली आहे. 4 वर्षे शिक्षा झालेले देवकर आप्पा संत महंत आहेत, त्यांना या सर्व गोष्टी माहिती असल्याने आपली वारी थांबावी, यासाठी आता कोणत्यातरी सत्ताधारी पक्षात जायचे आहे, असा टोमणा गुलाबराव पाटील यांनी गुलाबराव देवकर यांना लगावला.
View this post on Instagram
त्यांना आता पक्षबिक्ष काही नाही –
आमच्या पक्षात ते येणार नाहीत. भाजपमध्येही ते जाणार नाहीत. त्यामुळे त्यांचा प्रयत्न तिकडेच चालणार आहे. अजितदादांनी जेव्हा त्यांना विनंती केली होती, त्यावेळी आले असते, ही वेळ आली नसती. तेव्हा सांगितले की शरद पवार साहेब माझे नेते आहेत. आता सांगितले की, अजितदादा माझे नेते आहेत. उद्या कोणीही त्यांचे नेते होतील. आता भाजपकडेही ते जाऊन आले. भाजपने निर्णय घेतला नाही. उद्या ते माझ्याकडेही येतील काही सांगता येत नाही. त्यामुळे त्यांना आता पक्षबिक्ष काही नाही.
8 दिवसात अशी काय अडचण आली –
ज्या कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस काम केलं, आम्हीही हारलो होतो. पण आमच्या कार्यकर्त्यांना सोडून आम्ही पळालो नाही. आम्हाला त्या काळात गद्दार म्हणत होते, आम्ही तरी विचारांशी गद्दारी केली नाही. भगव्या विचाराबरोबर आम्ही राहिलो. तुम्ही कशाकरता गद्दारी करत आहात. 8 दिवसात अशी काय अडचण आली, तुम्हाला पक्षांतर करावं लागत आहे. थोडं तरी थांबा ना. थोडंही थांबायला तयार नाही. लगेच पळत आहात थैली घेऊन, या शब्दात आमदार गुलाबराव पाटलांनी देवकर आप्पांवर जोरदार टीका केली.
कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नये, आमदार आदिती तटकरेंनी लाडक्या बहिणींना काय आवाहन केलं?