जळगाव – येत्या एक-दोन दिवसात याचं उत्तर मी निश्चितपणाने देईन. कारण दोन दिवसात पालकमंत्रीपद जाहीर होईल, अशी माहिती कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. ते जळगाव येथे माध्यमांशी बोलत होते.
पालकमंत्रीपद वाटप रखडलं –
महायुतीला ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतर सुरुवातीपासूनच गोंधळ सुरू असल्याचे दिसत आहे. 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मुख्यमंतर्ी कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर 5 डिसेंबरला मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, मंत्रिमंडळात कुणाकुणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर हिवाळी अधिवेशनाचा पूर्वसंध्येला 15 डिसेंबर रोजी नागपूर येथे मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. त्यानंतरही मात्र आता 15 दिवस होऊन गेले तरीही पालकमंत्री पद वाटप रखडलेले पाहायला मिळत आहे. याबाबत माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर मंत्री गुलाबराव पाटील बोलत होते.
काय म्हणाले मंत्री गुलाबराव पाटील –
पालकमंत्री वाटप रखडल्याच्या प्रश्नावर माध्यमांशी बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, येत्या एक-दोन दिवसात याचं उत्तर मी निश्चितपणाने देईन. कारण दोन दिवसात पालकमंत्रीपद जाहीर होईल. तसेच जळगाव जिल्ह्यात तीन मंत्री आहेत. त्यामुळे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्रीपद कुणाला मिळणार याकडेही सर्वांचे लक्ष लागलेले असताना जळगावचे पालकमंत्रीपद आम्ही तिघेजण वाटून असे उत्तर देत त्यांनी या प्रश्नावर अधिक काही बोलणे टाळले.
VIDEO : आठवड्यात 6 जणांचा मृत्यू, जळगाव जिल्ह्यातील अपघात कधी थांबणार?, जिल्हाधिकारी Ayush Prasad Exclusive
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी देणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये एका तरुणाने उपमुख्यमंत्री शिंदे यांना इन्स्टाग्राम लाईव्हवर शिवीगाळ करत धमकी दिली. शिंदे यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीचे नाव हितेश प्रकाश धेंडे (24वर्षे) असून तो ठाणे येथील रहिवासी आहे. याप्रकरणी ठाण्यातील श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तरुणाचा शोध घेत आहेत. याबाबत माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, शिवसेनेच्या लोकांना धमकी देणे, हा काही पहिला दिवस नाही. पण एकनाथ शिंदे साहेबांना धमकी देणे, हा फार मोठा प्रकार राहिला आहे. हे कुणीच सहन करणार नाही. एकनाथ शिंदेंना धमकी द्यायची हिम्मत होत असेल तर शिवसैनिक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला.