चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
नंदुरबार, 13 मार्च : खान्देशातील विद्यार्थीही आता फक्त तालुका किंवा जिल्हास्तरावर नव्हे तर राष्ट्रीय स्तरावर आपले अस्तित्त्व सिद्ध करत आहेत, हे पुन्हा एकदा एका विद्यार्थिनीने सिद्ध केले आहे. खान्देशातील नंदुरबारची श्रद्धा अमृतकर ही विद्यार्थिनी देशात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.
काय आहे संपूर्ण बातमी –
आयआयटी मुंबई या देशातील अत्यंत प्रतिष्ठित संस्थेकडून घेण्यात आलेल्या Undergraduate Common Entrance Examination for Design या परीक्षेत नंदुरबारची श्रद्धा अमृतकर ही विद्यार्थिनी देशात इतर मागासवर्गीय प्रवर्गात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. यावर्षी या परीक्षेसाठी एकूण 14 ते 15 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. यामध्ये श्रद्धा हिने ऑल इंडिया रँक दुसरी तर इतर मागासवर्गीय प्रवर्गात पहिला क्रमांक मिळवला.
श्रद्धा अमृतकर या विद्यार्थिनीने हे यश मिळवल्यानंतर सुवर्ण खान्देश लाईव्हच्या टीमने तिच्याशी विशेष संवाद साधला. यावेळी तिने आपल्या भावना व्यक्त केल्या. सुवर्ण खान्देश लाईव्हसोबत बोलताना तिने सांगितले की, 21 जानेवारी रोजी माझी परीक्षा झाली. यानंतर 8 मार्चला माझा निकाल आला. ही परीक्षा ऑनलाईन स्वरुपात मुंबई येथे झाली. 300 गुणांच्या या परीक्षेत मला 182.37 इतके गुण मिळाले.
यावर्षी 14 ते 15 हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. डिझाईन या क्षेत्रात करिअर करावे, असं मी ठरवलं होतं. यानंतर मला आयआयटी मुंबईबाबत माहिती मिळाल्यावर मी या संस्थेच्या प्रवेश परीक्षेसाठी तयारी सुरू केली. या परीक्षेची संपूर्ण तयारी ही दोन वर्षांची होती. यासाठी मी सुरत येथे जाऊन क्लासेसही केले. यानंतर मला आता हे यश मिळाल्यानंतर आनंद होत असून यामध्ये मला माझ्या आईवडिलांचे पूर्ण सहकार्य लाभल्याचे ती म्हणाली. तसेच श्रद्धा हिला हिच्या या संपूर्ण अभ्यासाच्या तयारीदरम्यान तिचे मार्गदर्शक अंशुमन प्रामाणिक यांचे मार्गदर्शन लाभल्याचे तिने सांगितले.
श्रद्धा हिला देशातील प्रतिष्ठित संस्थेत मिळणार प्रवेश –
श्रद्धा अमृतकर या विद्यार्थिनीने आता ही परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर तिला देशातील अत्यंत प्रतिष्ठित अशा आयआयटी मुंबई येथे इंडस्ट्रिअल डिझाईन सेंटर येथे बॅचलर ऑफ डिझाईन या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळणार आहे. 4 वर्षाचा हा अभ्यासक्रम असणार आहे. यानंतर तिला प्रतिष्ठित अशा आयआयटी मुंबईकडून पदवी प्रदान करण्यात येईल. यानंतर करिअरच्या संधीचा विचार केला तर ती आपल्या शिक्षणानंतर प्रॉडक्ट डिझायनर किंवा इंडस्ट्रिअल डिझायनर म्हणून कार्य करेल. श्रद्धा हिचे वडील राजेश अमृतकर हे नंदुरबार येथे नायब तहसिलदार आहेत. तर आई एलआयसीमध्ये कार्यरत असल्याचे तिने सांगितले. तिच्या या यशानंतर तिचे अभिनंदन केले जात आहे.