मुंबई, 16 फेब्रुवारी : अन्न व औषध प्रशासन विभागामधील लाच प्रकरणाची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी लाच घेताना पकडलेल्या लिपिकाविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. संबंधित लिपिकाची केवळ चौकशीच नव्हे, तर त्यांची प्रतिनियुक्ती रद्द करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
विभागातील दक्षता पथकाला या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. लिपिक राजू ढेरिंगे याच्याविरुद्ध वस्तुनिष्ठ आणि सर्वंकष अहवाल तातडीने सादर करण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, राजू ढेरिंगे हे मूळ अन्न व नागरी पुरवठा विभाग येथील कर्मचारी असून सध्या अन्न व औषध प्रशासन विभागात प्रतिनियुक्तीवर कार्यरत होते.
नेमकं प्रकरण काय? –
मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासन विभागात लाचखोरीचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. निलंबित मेडिकल परवाना पुन्हा सुरू करून देण्यासाठी लिपिक राजू ढेरिंगे याने 50 हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार होती. तडजोडीनंतर 35 हजार रुपये स्वीकारताना त्याला अटक करण्यात आली. दरम्यान, मंत्रालयातील लाच प्रकरणावरून विरोधकांनी सरकारविरोधात जोरदार टीका केली.
मंत्री नरहरी झिरवळ यांची भूमिका –
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयातच लाच प्रकरण उघडकीस आल्याने त्यांच्यावर देखील प्रश्न उपस्थित केले जात होते. दरम्यान, त्यांनी या लाचप्रकरणाबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली. लाचेची रक्कम कितीही असो, सरकारी कर्मचाऱ्याने अशा प्रकारे पैसे स्वीकारणे पूर्णपणे अयोग्य आहे. जर पैसे घेतल्याचे सिद्ध झाले, तर संबंधित व्यक्तीला कायद्यानुसार शिक्षा भोगावी लागेल. तसेच जर या प्रकरणाचे कोणतेही पुरावे माझ्याशी संबंधित असल्याचे सिद्ध झाले, तर त्याची संपूर्ण जबाबदारी स्वीकारण्यास मी तयार असून या भ्रष्टाचाराशी माझा संबंध असल्याचे ठोसपणे सिद्ध झाले तर मी राजीनामा देईन, असे नरहरी झिरवळ यांनी म्हटलंय.
View this post on Instagram






