चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जामनेर, 15 जून : वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी देशातील सर्वात कठीण परीक्षा म्हणजे राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षा (NEET) होय. आणि ह्या नीट परिक्षाद्वारे चांगल्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळावा, यासाठी विद्यार्थी रात्रंदिवस कठोर परिश्रम करतात. दरम्यान, नुकताच नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये मुळची जामनेर तालुक्यातील सुश्रृता पाटील हिने नीट परीक्षा 720 पैकी 701 मार्क्सने उत्तीर्ण करत मोठे यश मिळवले आहे.
सुश्रृता पाटील ही डॉ. प्रविण पाटील आणि डॉ. श्वेता पाटील यांची कन्या असून सध्या ते कल्याण येथे वास्तव्यास आहेत. दरम्यान, सुश्रृता पाटीलच्या यशानंतर ‘सुवर्ण खान्देश लाईव्ह’ने तिच्यासोबत विशेष संवाद साधला. यावेळी सुश्रृताने तिच्या नीट परिक्षेतील यशाबद्दल सविस्तरपणे माहिती दिली.
सुश्रृताने नीट परिक्षेत मिळवले मोठे यश –
सुश्रृता पाटीलचे दहावीपर्यंतचे शिक्षण हे कल्याणमधील हॉलीक्रास कॉन्व्हेंट स्कूलमधून पुर्ण झाले. तर अकरावी व बारावीचे शिक्षण तिने के.एम. अग्रवाल कॉलेजमधून पुर्ण केले. दरम्यान, अकरावीची प्रवेश प्रक्रिया पार पडल्यानंतर तिने नीट परिक्षेच्या तयारीला सुरूवात केली होती. दोन वर्ष कठोर मेहनत घेत वैद्यकीय क्षेत्रात कठीण मानल्या जाणाऱ्या अशा नीट परिक्षेत तिने 720 पैकी 701 मार्क्स मिळवले. तसेच ती बारावीची परिक्षा 85 टक्क्यांसह उत्तीर्ण झाली.
नीटची तयारी कशी केली? –
नीट परिक्षेच्या तयारीबद्दल सुश्रृता सुवर्ण खान्देश लाईव्हसोबत बोलताना म्हणाली की, स्पर्धात्मक परिक्षेसाठी सातत्य महत्वाचे असते. यामुळे दहावीची परीक्षा संपल्यानंतर एप्रिलमध्येच मी नीट परिक्षेची तयारीस सुरूवात केली होती. 700 पेक्षा अधिक मार्क्स मिळावेत, हे मुख्य ध्येय समोर ठेऊन नीटसाठी अभ्यास सुरू केला. यामध्ये ‘आकाश’ या खासगी कोचिंग संस्थेत मी नीटसाठी क्लासेस जॉईन केले होते. तसेच क्लासेसच्या व्यतिरिक्त सात ते आठ तास सेल्फ स्टडी करत होते. यामध्ये क्लासेसची उजळणी आणि प्रश्नपत्रिका सोडवणे यावर भर दिला आणि अखेरीस हे यश मिळवले.
नीट परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतरच्या भावना –
सुश्रृता पाटीलने नीट परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतरच्या भावनांबाबत सांगितले की, नीट परीक्षा दिल्यानंतर काही दिवसांनी Answer Key जाहीर झाली होती. यावरून नीट परीक्षेत मला 700 पेक्षा अधिक मार्क्स मिळतील, असा प्राथमिक अंदाज होता. मात्र, ज्यावेळी अधिकृतरित्या निकाल जाहीर झाला आणि त्यामध्ये मला 701 मार्क्स मिळाले. आणि म्हणून या दोन वर्षांत केलेल्या मेहनतीमुळे यश मिळाल्याने खूप मोठा आनंद झाला. त्यावेळी मी पाचोरा येथे माझ्या मामांकडे असल्याने आणि आई-वडील कल्याणला असल्याने उर भरून आला होता.
सुश्रृताने तिच्या यशाच्या श्रेयाबद्दल सांगितले की, नीट परीक्षेचा अभ्यास करताना आई-वडिलांनी ज्या पद्धतीने मार्गदर्शन तसेच पालक म्हणून साथ दिली, ती अत्यंत महत्वाची होती. परिक्षेच्या आधी शेवटच्या महिन्यात परिक्षेचा तणाव जाणवत होता. यानंतर पाचोरा येथील माझे मामा डॉ. विशाल पाटील यांनी माझ्यावर केलेल्या होमियोपॅथिक उपचारमुळे मला परिक्षेसाठी मदत झाली. दरम्यान, आई-वडील, भाऊ, मामा आणि काका यांना मी माझ्या यशाचे श्रेय देत असल्याचे सुश्रृता पाटीलने सांगितले.
स्पर्धा परिक्षा करणाऱ्यांना दिला महत्वाचा सल्ला –
सुश्रृता पाटील स्पर्धा परिक्षा करणाऱ्यांना सल्ला देताना म्हणाली की, स्पर्धा परिक्षेत जे काही क्षेत्र निवडाल, त्यामध्ये यश मिळवण्यासाठी समर्पित होऊन कठीण मेहनत घेतली पाहिजे. स्पर्धा परिक्षांमध्ये सतत अपयश मिळाल्यामुळे आत्मविश्वास कमी होतो. मात्र, अशावेळी हार न मानता दृढ निश्चयाने प्रयत्न सुरू ठेवले पाहिजे, असेही सुश्रृता म्हणाली.
हेही वाचा : सामनेरच्या तरुणाची गरुडझेप! UPSC परीक्षेत मिळवलं मोठं यश; वाचा, कुणालची प्रेरणादायी कहाणी