पुणे, 21 ऑक्टोबर : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असताना काल भाजपने रविवारी 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यानंतर आज तिसऱ्या आघाडीकडूनही उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी आणि आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वातील परिवर्तन आघाडीने आपल्या 8 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
‘परिवर्तन महाशक्ती’ या तिसऱ्या आघाडीचे 8 उमेदवार जाहीर –
परिवर्तन महाशक्तीकडून 8 उमेदवारांची जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये पहिल्या यादीत आमदार बच्चू कडू यांचं नाव असून बच्चू कडू यांना अचलपूर मतदारसंघातून प्रहारच्या चिन्हावर उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यासह बच्चू कडूंसह एकूण 8 उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. तर स्वाभिमानीच्या 2 उमेदवारांची नावे उद्या 22 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येणार आहेत.
जळगाव जिल्ह्यातून अनिल चौधरी यांना रावेरमधून मिळाली संधी –
जळगाव जिल्ह्यातून रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातून अनिल चौधरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, एक महिन्यापुर्वीच बच्चू कडू हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी अनिल चौधरी यांची रावेर मतदारसंघातून प्रहार पक्षाकडून उमेदवारी जाहीर केली होती. दरम्यान, याबाबतची आज अधिकृत घोषणा करण्यात आल्याने रावेर मतदारसंघात राजकीय चुरस वाढली आहे.
रावेर मतदारसंघ –
रावेर यावल विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व हे काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी करत आहेत. त्यांनी 2019 च्या निवडणुकीत हरिभाऊ जावळे यांचा पराभव केला होता. दरम्यान, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ते त्यांचे सुपूत्र धनंजय चौधरी हे रिंगणात उतरणार असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे वंचितकडून तृतीयपंथी शमिभा पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच काल भाजपकडून अमोल जावळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, आता प्रहारचे अनिल चौधरी यांचे देखील या मतदारसंघातील उमेदवारांसमोर मोठे आव्हाण असणार आहे.
परिवर्तन महाशक्तीकडून घोषित करण्यात आलेल्या उमेदवारांची नावे –
1. अचलपूर – बच्चू कडू – प्रहार
2. रावेर – अनिल चौधरी – प्रहार
3. चांदवड – गणेश निंबाळकर – प्रहार
4. देगलूर – सुभाष सामने – प्रहार
5. ऐरोली – अंकुश कदम- महाराष्ट्र स्वराज पक्ष
6. हदगाव हिमायतनगर – माधव देवसरकर – महाराष्ट्र स्वराज्य पक्ष
7. हिंगोली – गोविंदराव भवर – महाराष्ट्र राज्य समिती
8. राजुरा – वामनराव चटप – स्वतंत्र भारत पक्ष
हेही वाचा : भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर; जळगाव जिल्ह्यात ‘या’ नवीन चेहऱ्याला संधी