जळगाव, 20 मार्च: “शेतकरी हा अन्नदाता असून देवासमान आहे. रासायनिक खतांचा अतिरेक थांबवून नैसर्गिक शेतीकडे वळणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केले. अमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदिरात ‘भूमी सुपोषण व संवर्धन’ या राष्ट्रीय अभियानाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.
देशातील शेतीजमीन सुपीक राहावी, रासायनिक खतांचा वापर कमी व्हावा आणि शाश्वत शेतीला चालना मिळावी या उद्देशाने अक्षय कृषी परिवार व मंगळग्रह सेवा संस्था, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमास केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ,आमदार अनिल पाटील, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्यासह विविध मान्यवर, सामाजिक व धार्मिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी पुढे सांगितले की, रासायनिक खत व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनीची सुपीकता कमी होत असून त्याचा परिणाम मानवी आरोग्यावरही होत आहे. योग्य पद्धतीने नैसर्गिक शेती केल्यास उत्पादनात घट होत नाही, उलट जमिनीची गुणवत्ता सुधारते. “धरती माता वाचवणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे,” असे सांगत त्यांनी शेतकऱ्यांनी किमान काही क्षेत्रावर नैसर्गिक शेतीचे प्रयोग करावेत, असे आवाहन केले.
शेतकऱ्यांनी नैसर्गिक व सेंद्रिय शेतीकडे वळणे आवश्यक – मंत्री गिरीश महाजन
मंत्री गिरीश महाजन म्हणाले, आपण जमिनीला केवळ उत्पादन देणारे साधन समजतो; मात्र तिच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. वाढत्या रासायनिक खत व कीटकनाशकांच्या वापरामुळे अन्नातून शरीरात जाणाऱ्या रसायनांमुळे गंभीर आजारांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे मातीची सुपीकता टिकवण्यासाठी शेतकऱ्यांनी नैसर्गिक व सेंद्रिय शेतीकडे वळणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करणे अत्यावश्यक – पालकमंत्री गुलाबराव पाटील
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, भारत हा जगात एकमेव देश आहे जो भूमीला ‘माता’ मानतो. मात्र, आपणच तिच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहोत. रासायनिक खत व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे मातीची सुपीकता आणि अन्नाची गुणवत्ता धोक्यात येत असून त्याचा परिणाम थेट मानवी आरोग्यावर होत आहे. त्यामुळे शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
अमळनेर येथे ‘भूमी सुपोषण व संवर्धन’ राष्ट्रीय अभियानाचा उत्साहात शुभारंभ –
देशातील शेतीजमीन रासायनिक खतांच्या वापरामुळे निकस होत चालल्याच्या पार्श्वभूमीवर कृषी व पर्यावरण क्षेत्रातील विविध संस्थांनी सन २०२१ पासून ‘भूमी सुपोषण व संवर्धन’ हे राष्ट्रव्यापी जनअभियान सुरू केले आहे. गेल्या पाच वर्षांत देशभरातील सुमारे ३० हजार गावे व ५४ हजार शहरी भागांत जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आले आहेत. चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर या अभियानाचा राष्ट्रीय शुभारंभ अमळनेर येथे करण्यात आला. या अभियानाचा कालावधी १९ मार्च २०२६ ते अक्षयतृतीया १९ एप्रिल २०२६ पर्यंत राहणार असून या कालावधीत देशभर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. अक्षय कृषी परिवाराचे उपाध्यक्ष डॉ. गजानन डांगे यांनी भूमी सुपोषण व संवर्धन अभियानाची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंगळ ग्रह संस्थांचे अध्यक्ष डिगंबर महाले यांनी केले. कार्यक्रमाला परिसरातील शेतकरी व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी ‘धरती माता संरक्षण’ करण्याचा संकल्प घेत अभियान यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला.






