जळगाव, 5 मार्च : लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज जळगावातील सागर पार्क मैदानावर होणाऱ्या युवा संमेलनात मार्गदर्शन करणार आहेत. या संमेलनासाठी 25 हजार युवक उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.
अमित शहा आज दुपारी जळगावात –
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे दुपारी 3 वाजता हेलिपॅड येथे आगमन होणार आहे. तेथून सागर पार्क येथील कार्यक्रम स्थळी दुपारी 3 वाजून 20 मिनिटांनी ते दाखल होतील. युवा संमेलन संपल्यानंतर ते संध्याकाळी 5 वाजता जळगाव येथून रवाना होतील.
यांची असेल उपस्थिती –
सागर पार्कवर आयोजित केलेल्या या कार्याक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित, केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण तथा जनजाती कार्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती भाजचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांनी दिली.
कडेकोट सुरक्षाव्यवस्था –
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जळगावातील कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलीस प्रशासनाने कडेकोट सुरक्षाव्यवस्था उभारली असून कार्यक्रमादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी उपाययोजना केली आहे. तत्पूर्वी दिल्लीवरून अमित शहा यांच्या सुरक्षेसाठी विशेष सुरक्षा पथक जळगावात दाखल झालेले आहेत.
हेही वाचा : ‘…..म्हणून आम्ही उठाव केला,’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुक्ताईनगरात काय म्हणाले?