चाळीसगाव, 13 नोव्हेंबर : मतदारसंघाचा विकास करणाऱ्या, तसेच सुख-दुखात सहभागी होणाऱ्या आणि कोरोनासाऱख्या महामारीच्या काळात तुमच्या मदतीला आलेल्या मंगेश चव्हाण यांना पुन्हा एकदा निवडून दिल्यास त्यांना मोठी जबाबदारी देईल, असे वचन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले. चाळीसगावात आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या जाहीरसभेत ते आज बोलत होते. यावेळी अमित शहा यांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्या कार्यकाळात चाळीसगावात केलेल्या कामांची माहिती दिली.
अमित शहा यांची राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका –
काँग्रेस केवळ खोट्या वचनांच्या आधारावर राजकारण पुढे घेऊन गेले. आता महाराष्ट्रात राहुल गांधी हे बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेले संविधान घेऊन जात आहेत. संसदेत शपथ घेतली त्यावेळी देखील संविधान त्यांच्या हाती होते. मात्र, काही पत्रकारांच्या हाती ते संविधान आले तेव्हा त्यांनी संविधान उघडले आणि त्यावेळी त्यातील सर्व पाने कोरी होती. म्हणून राहुल गांधी यांनी खोटे संविधान दाखवून जनतेचा विश्वासघात केला असल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अपमान केला असल्याचेही ते म्हणाले.
महाविकास आघाडीचा सुपाड साफ होणार – अमित शहा
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, मुंबईसह मराठवाडा अशा सर्वच भागात जाऊन आलोय. आणि त्याठिकाणीचे वातावरण पाहिले आहे. आणि चाळीसगावकरांनो तुम्हाला निवडणुकीचा परिणाम जाणून घ्यायचा असेल तर येत्या 23 तारखेला महाविकास आघाडीचा सुपाड साफ होणार, असे केंद्रीय मंत्री अमित शहा म्हणाले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात महायुतीचे सरकार बनणार असल्याचेही ते म्हणाले.
केंद्रीय मंत्री अमित शहा पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर उद्योगांसाठी गुंतवणूक कमी झाली असल्याचा आरोप काँग्रेसने केला. खरंतर, उद्योगांसाठी गुंतवणूक कमी होणे हे त्यांच्या आघाडी सरकारच्या काळातले काम होते. मात्र, राज्यातले एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार यांचे सरकार आल्यानंतर दोन वर्षांत गुंतवणुकीच्या तुलनेत भारतात अव्वल क्रमांकावर आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातील विकास कामांना महाविकास आघाडी सरकारने बंद केले असल्याचाही आरोप अमित शहा यांनी केला.
यावेळी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह खासदार स्मिताताई वाघ, आमदार किशोर आप्पा पाटील, एरंडोलचे महायुतीचे उमेदवार अमोल पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांच्यासह महायुतीतीतील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई तसेच इतर पक्षातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
हेही वाचा : “…तर राजकारण सोडून देईन”, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्री गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणाले?