पाचोरा : खान्देशातील नावाजलेले साहित्यिक अशी ओळख असलेल्या पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथील डॉ. रमेश सूर्यवंशी यांचा आज मराठी भाषा अभ्यासक पुरस्काराने सन्मान होणार आहे. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे आजोयित कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रमेश सूर्यवंशी यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
डॉ. रमेश सूर्यवंशी यांनी अहिराणी बोलीतून संशोधन करून, अत्यंत महत्त्वाची ग्रंथसंपदा निर्माण करण्यासोबतच अहिराणी शब्दकोश, अहिराणी म्हणी आणि वाक्प्रचार, तसेच खान्देशातील कृषी जीवनावर सचित्र ग्रंथ तयार केला. त्यांच्या या कार्याची दखल घेत शासनाच्या वतीने देण्यात येणारा डॉ. अशोक केळकर मराठी भाषा- अभ्यासक पुरस्कार 2024 (व्यक्ती) जाहीर झाला आहे. आज मराठी भाषा गौरव दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. दोन लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह व मानपत्र, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
डॉ. रमेश सूर्यवंशी हे मूळ पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथील रहिवासी आहेत. त्यांचे शिक्षण इंग्रजी विषयात एम.ए., बी.एड. असून ते पीएच.डी. धारक आहेत. यासोबतच त्यांनी कन्नड येथील छत्रपती शिवाजी महाराज कनिष्ठ महाविद्यालयात तब्बल 34 वर्षे इंग्रजी विषयाचे अध्यापन केले आहे. डॉ. सूर्यवंशी यांचे अहिराणी भाषा-वैज्ञानिक अभ्यास, अहिराणी बोली म्हणी वाक्प्रचार, अहिराणी शब्दकोश ही पुस्तके सन 1997 मध्ये प्रकाशित झाली आहेत. ‘प्रांजल’ ही मराठी कादंबरी वर्ष 1999 मध्ये आली. तर यानंतर खान्देशातील कृषक जीवन सचित्र कोश वर्ष 2002 मध्ये प्रकाशित झाला.
सूर्यवंशी यांनी स्वतःची आदिवासी ठाकर डॉट कॉम ही वेबसाइट 2012 पासून सुरू केली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आदिवासी ठाकरांना प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी 1986 पासून सतत संघर्ष केला आहे. अहिराणी ओवी-कोश, अहिराणी ओवीगीतांचा चिकित्सक अभ्यास आणि खान्देशातील अहिराणी बोलीतील लोकसाहित्य ही त्यांची संशोधनात्मक तीन पुस्तके लवकरच प्रकाशित होत आहेत.
सर्व बोलींतून आपली मराठी भाषा निर्माण झाली आहे. या बोली भाषा संस्कृतीने सजलेल्या आहेत. या संस्कृतीचे मूळ कृषी संस्कृतीशी जुळलेले आहे. त्यामुळे मराठीच्या विकासाचे रूप आपणास संपूर्ण जगात पाहायला मिळत आहे, अशी प्रतिक्रिया डॉ. रमेश सूर्यवंशी यांनी दिली.
हेही वाचा – काय आहे अहिराणी भाषेचा इतिहास?, खान्देशातील नावाजलेले साहित्यिक डॉ. रमेश सुर्यवंशी यांचा विशेष लेख