ईसा तडवी, प्रतिनिधी
पिंपळगाव हरे. (पाचोरा), 17 एप्रिल : कोरोना महामारिचा काळा हा सर्वांसाठी कठीण आणि तितकाच आव्हानाचा काळ होता. विशेषतः स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या युवकांसाठी हा काळ अनिश्चतेतचा मानला गेला. मात्र, याच काळात स्पर्धा परिक्षांच्या तयारीसाठी मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करत अनेक तरूण आजपर्यंत शासकीय सेवेत दाखल झाले आहेत. याचेच एक ताजे उदाहरण म्हणजे पोलिस उपनिरिक्षक पदी निवड झालेला विशाल पाटील हा तरूण. यानिमित्त सुवर्ण खान्देश लाईव्हने विशालची विशेष मुलाखत घेत त्याच्या पीएसआय पदापर्यंतचा प्रवास कसा राहिला याबाबत जाणून घेतले.
काय आहे संपूर्ण बातमी? –
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नुकताच पोलिस उपनिरीक्षक पदासाठी निकाल जाहीर केला आहे. दरम्यान, पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील विशाल गोपाल पाटील या तरूणाची पोलिस उपनिरीक्षक पदासाठी निवड झाली आहे. विशालने अभ्यासात सातत्य ठेवत जिद्द, मेहनत आणि सेल्फ स्टडीच्या बळावर हे यश संपादन केले आहे.
विशाल पाटील हा मुळचा पिंपळगाव हरेश्वर येथील रहिवासी असून त्याचे वडील गोपाल पाटील हे ग्रामपंचायतमध्ये पाणीपुरवठा विभागात कार्यरत आहेत तर आई गृहिणी आहे. पिंपळगाव हरे. येथील ग्रामविकास विद्यालयात विशालचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पुर्ण झाले. तसेच जामनेर येथील इंदिराबाई ललवाणी कनिष्ठ महाविद्यालयात त्याने विज्ञान शाखेत बारावी पर्यंतचे शिक्षण घेतले. यानंतर नाशिक येथील मराठा विद्या प्रसारक संस्थेत बीएससी अॅग्री म्हणजेच कृषी क्षेत्रात 2018 साली पदवी पुर्ण केली.
स्पर्धा परिक्षेस केली सुरूवात –
विशालने कृषी क्षेत्रात पदवी पुर्ण केल्यानंतर सुरूवातीला त्याने कृषी सेवक पदासाठी तयारी सुरू केली. यामध्ये तो पहिल्या प्रयत्नात मुलाखतीत अपात्र ठरला. यानंतर विशालने एमपीएससीच्या वर्ग-2 पदासाठी तयारीस सुरूवात केली. यामध्ये पीएसआय पदासाठी 2020 मध्ये शारिरीक चाचणीला कमी गुण मिळाल्याने अपयश आले. मात्र, या अपयशाने खचून न जाता 2021 साली निघालेल्या पीएसआयच्या पदासाठी अर्ज करत पुन्हा एकदा त्याने नव्या उत्साहात परिक्षेसाठी तयारी केली.
पोलीस उपनिरीक्षक पदी निवड –
एमपीएससी मार्फत 2021 साली घेण्यात आलेल्या वर्ग -2 च्या पदासाठी 4 लाखांपेक्षा अधिक उमेदवारांनी अर्ज केला. दरम्यान, यामध्ये 10 ते 11 हजारांहून अधिक उमेदवार मुख्य परिक्षेसाठी पात्र ठरले. यापैकी 1400 उमेदवारांची शारिरीक चाचणीसाठी निवड करण्यात आली आणि शारिरीक चाचणीनंतर 600 उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले. एमपीएससीने अंतिमतः 376 मुलांची निवड केली असून यामध्ये विशालने 289.5 गुण प्राप्त करत इतर मागासवर्गीय प्रवर्गातून राज्यातून 31 वा क्रमांक पटकावत पीएसआय पदाला गवसणी घातली आहे.
पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंतचा असा होता प्रवास –
विशाल पाटील सुवर्ण खान्देश लाईव्हसोबत बोलताना म्हणाला की, स्पर्धा परिक्षेचा अभ्यास मी सेल्फ स्टडीने केला. कोरोना काळात मी माझ्या गावी अर्थात पिंपळगाव हरे. येथे घरीच अभ्यास केला. यानंतर जळगाव येथील श्री श्री अभ्यासिकेत सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत म्हणजेच 14 तास अभ्यास केला. स्पर्धा परिक्षेची तयारी करत असताना मला सुरूवातीला पुष्कर शेवाळे (विक्री कर निरीक्षक) यांचे मार्गदर्शन लाभले.
कोरोना काळ हा सर्वांसाठी भयंकर होता. मात्र, त्यावेळी मला मिळालेल्या वेळेचा सदुपयोग केल्यानेच मला हे यश मिळाले. कोरोना काळात शासनाच्या जाहिराती देखील प्रसिद्ध होत नव्हत्या. असे असताना मी मात्र, स्वतःला धीर देत प्रेरित ठेवले आणि सेल्फ स्टडी सुरू ठेवली आणि आज हे यश मिळवले असल्याच्या भावना विशाल पाटीलने व्यक्त केल्या.
पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाल्यानंतरच्या भावना –
पीएसआय पदी निवड झाल्यानंतरच्या भावनेबाबत विशाल म्हणाला की, मला विश्वास होता की माझी निवड होणार पण एमपीएससीने निकाल जाहीर केल्यानंतर माझी पीएसआय पदी निवड झाली, याचा खूप मोठा आनंद झाला. या यशात माझ्या सर्व कुटुंबाचा सहभाग आहे. वडीलही माझ्या यशावर आनंदित असून आईला तर आनंदाश्रू आल्याचे विशाल पाटीलने सांगितले. माझे आई-वडील, पुष्कर शेवाळे (विक्री कर निरीक्षक), ऋषीकेश चौधरी (मंडळ कृषी अधिकारी) व मित्र तुषार शिवसागर, करण चव्हाण, आकाश बोरसे, अजय धनगर, प्रितेश सोनवणे व अक्षय महाजन (गावातील मित्र) यांना मी या यशाचे श्रेय देत असल्याचे विशालने सांगितले.
तरूणांना दिला महत्वाचा संदेश –
विशाल पाटील सुवर्ण खान्देश लाईव्हसोबत बोलताना म्हणाला की, स्पर्धा परिक्षांची तयारी करत असताना स्वतःशी शिस्तबद्ध असणे गरजेचे आहे. निकाल चांगले असो वा वाईट सातत्याने प्रयत्न करत राहणे महत्वाचे आहे. सतत अपयश येत असेल तर प्लॅन बी पण तयार असणे गरजेचे आहे. पण ज्याला स्वतःवर पुर्णपणे विश्वास असेल अशा तरूणांनी लक्ष्य निर्धारित करत यशासाठी प्रयत्न केले पाहिजे, असा सल्ला विशाल पाटील यांनी स्पर्धा परिक्षाची तयारी करणाऱ्या युवकांना दिला. दरम्यान, विशाल पाटीलची पीएसआय पदी निवड झाल्यानंतर त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
हेही वाचा : Success Story : सलग 4 वेळा अपयश, पण चोपड्याच्या वैभवीनं करुन दाखवलं! शेवटी सरकारी अधिकारी झालीच!