भडगाव, 16 एप्रिल : भडगाव तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तब्बल 80 हजार रुपये किंमतीचा शेततळ्यात टाकलेला वाटरप्रुफ कागद चोरुन नेल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना भडगाव तालुक्यातील अंतुर्ली बु. येथे घडली असून याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
काय आहे संपूर्ण घटना –
याप्रकरणी अंतुर्ली बुं. येथील महेश सुभाष पाटील या तरुणाने भडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. महेश सुभाष पाटील (वय 28), हा त्याची पत्नी, आई आणि वडिलांसह अंतुर्ली बु. येथे राहतो. त्याची अंतुर्ली बु. शिवारात शेती असून तो शेती करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. दरम्यान, त्याने आपल्या शेतजमिनीसाठी एक एकर शेतीमध्ये शेततळे बांधलेले आहे. त्यामुळे शुक्रवारी 14 एप्रिल रोजी सकाळी तो 6 वाजेच्या सुमारास शेततळ्यात मोटार चालू केली असल्याने शेततळे कुठपर्यंत भरले आहे, पाहण्यासाठी गेला होता.
मात्र, यावेळी त्याला शेततळ्यात लावलेला 500 मायक्राँन वाटरप्रुफ कागद शेततळ्यातून कोणीतरी अर्धवट कापून घेऊन गेलेला दिसला. तेव्हा तो आणि त्याच्या काकाचा मुलगा योगेश रविंद्र पाटील यांनी याठिकाणी परिसरात शेततळ्यासाठी लावण्यात आलेल्या कागदाचा शोध घेतला. मात्र, त्यांना तो त्याठिकाणी मिळून आला नाही. त्यामुळे शेततळ्याचा कागद कुणीतरी चोरुन नेला आहे, अशी त्यांची खात्री झाल्याचे महेश पाटील याने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, या शेततळ्यातील 80 हजार रुपये किमतीचा शेततळ्यात टाकलेला 500 मायक्राँन वाटरप्रुफ काळ्या रंगाचा कागद अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस पुढील तपास करत आहेत.