चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव, 26 ऑगस्ट : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुख्य उपस्थितीत काल, रविवार रोजी लखपती दीदींचा देशव्यापी मेळावा पार पडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महिला बचत गटांसाठी लाभकारी ठरणाऱ्या योजनांसाठी तब्बल 7 हजार 500 कोटींच्या निधीचे ई-वितरण केले. तसेच नव्याने लखपती ठरलेल्या 11 लाख लखपती दीदींना पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्रशस्तीपत्र देण्यात आले. दरम्यान, एकीकडे लाडकी बहिण योजना लोकप्रिय ठरली असताना लखपती दीदी योजना नेमकी आहे तरी काय? असा मुद्दा सर्वीकडे उपस्थित केला जातोय.
लखपती दीदी योजनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगावात काय म्हणाले? –
जळगावात पार पडलेल्या लखपती दीदींच्या मेळाव्यात ते उपस्थित महिलांसोबत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ही योजना केवळ महिला व भगिनींनाच सक्षम करणारी नाही तर पुर्ण कुटुंब आणि पिढीला सशक्त करणारी आहे. महिला कमावत्या बनल्याने त्यांचा अधिकार व सन्मान वाढतोय आणि त्याच्या माध्यमातून देशाच्या विकासाला हातभार लागतोय. दरम्यान, आपल्या देश जगातील तिसरी मोठी आर्थिक व्यवस्था बनण्याच्या मार्गावर असताना महिला आणि त्यांच्या बचत गटांचे फार मोठे योगदान यामध्ये असल्याचेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
नेमकी काय आहे लखपती दीदी योजना? –
केंद्र सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबविण्यात येतात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून महिला सशक्तिकरणावर सरकारने विशेष भर दिलाय. देशातील महिलांची आर्थिक, सामाजिक प्रगती व्हावी यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात असताना त्याचाच एक भाग सरकारकडून म्हणून मागील वर्षापासून लखपती दीदी ही योजना राबवली जात आहे. उद्योग क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढावा, हा उद्देश समोर ठेवून ही योजना चालू करण्यात आलीय. दरम्यान, एकूण तीन कोटी महिलांना या योजनेच्या माध्यमातून जोडण्याचा केंद्र सरकारचा उद्देश आहे.
लखपती दीदी योजनेचा लाभ –
लखपती दीदी ही योजना महिला बचत गटाशी जोडल्या गेलेल्या महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी चालू करण्यात आलेली आहे. महिलांचे आर्थिक उत्पन्न वाढावे, यासाठी प्रयत्न केले जातात. तसेच महिलांमध्ये स्वयंरोजगाराची निर्मिती व्हावी, असाही उद्देश या योजनेमागे आहे. दरम्यान, या योजनेच्या मदतीने महिलांना कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण देण्यात येते आणि त्यानंतर स्वत:चा उद्योग उभा करण्यासाठी या महिलांना एक लाख रुपयांपासून ते 5 लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज दिले जाते.
नेमकी अट काय? –
लखपती दीदी या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर काही अटी आहेत. त्यांची पूर्तता करणे गरजेचे असून या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर अर्जदार महिलेच्या घरातील कोणताही सदस्य शासकीय नोकरदार नसायला हवा. दरम्यान, ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा महिला अर्ज करण्यासाठी पात्र ठरतात.
अर्ज कसा करायचा? –
महिलांना लखपती दीदी योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर सर्वात आधी महिलांना बचत गटाच्या माध्यमातून एका उद्योगाचे नियोजन करावे लागेल. यानंतर तयार केलेला उद्योगाचा आराखडा सरकारला पाठवला जाईल. दरम्यान, या आराखड्याचा तसेच लखपती दीदी योजनेसाठीच्या अर्जाची सरकार पडताळणी करेल. त्यानंतर सर्व अटींची पूर्तता होत असेल तर महिलांना पाच लाख रुपयांपर्यंत बिनव्याची कर्ज दिले जाईल.
हेही वाचा : महिला अत्याचाराच्या वाढत्या घटना, जळगावात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला कठोर इशारा, म्हणाले..