ईसा तडवी, प्रतिनिधी
माहेजी (पाचोरा) : पाचोरा तालुक्यातील माहेजी या गावी माहिजीदेवीचा यात्रोत्सव आजपासून सुरू होत आहे. गिरणा नदीच्या तिरावर नांद्रा गावापासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या माहेजीदेवीचा यात्रोत्सव हा संपूर्ण खान्देशात प्रसिद्ध आहे.
ब्रिटिश काळापासून हा यात्रोत्सव सुरू झाला, असे सांगितले जाते. तसेच तब्बल 15 दिवस हा यात्रोत्सव चालतो. या यात्रोत्सवात लोकनाट्य, पाळणे, मौत का कुआ, भांड्याची दुकाने, हॉटेल, खेळणी, प्रसादाची दुकाने, रसवंती, अशाप्रकारे नानाविध प्रकारचे जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, अशी विविधता यात्रेत दिसून येते. त्यामुळे या यात्रेत मोठी गर्दी पाहायला मिळते.
ब्रिटिश काळात येथे करवसुली व्हायची. तेव्हा या भागात कुठेही बाजारपेठ उपलब्ध नव्हती, त्यामुळे ही यात्रा सहा महिने भरायची. देवीच्या आख्यायिकेनुसार, सोळाव्या शतकात येथे मंदिर उभारणी झाली. तेव्हा येथे सहा महिन्यांची यात्रा भरू लागली. संपूर्ण देशभरातून व्यापारी येथे येत होते.
नवसाची परंपरा आणि पालखी सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो. यात्रेदरम्यान, पाचोरा व एरंडोल आगारातून जादा बसची व्यवसाय केली जाते. ग्रामपंचायतीकडून सर्व व्यवस्था केली जाते. याठिकाणी या माहिजी देवी मंदिर संस्थानचा तत्कालीन खासदार ए. टी. पाटील यांच्या प्रयत्नातून तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत मंदिर परिसराचा विकास करण्यात आला आहे. तालुक्यातील एक जागृत देवस्थान व नवसाला पावणारी देवी म्हणून माहेजी देवी मातेची ख्याती आहे.
हेही वाचा – ‘सुवर्ण खान्देश’चे प्रतिनिधी ईसा तडवी यांचा पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस स्टेशनच्या वतीने सन्मान