नवी दिल्ली : तरुण IFS अधिकारी निधी तिवारी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खाजगी सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. निधी तिवारी 2014 च्या बॅचमधील त्या भारतीय परराष्ट्र सेवा अधिकारी आहेत.
29 मार्च रोजी कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने (DoPT) निवेदन जारी केले होते. या निवेदनानुसार, मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने त्यांच्या नियुक्तीला तत्काळ प्रभावाने मान्यता दिली. पंतप्रधानांचे आतापर्यंत विवेक कुमार आणि हार्दिक सतीशचंद्र शाह हे दोन खाजगी सचिव होते. यानंतर आता निधी तिवारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कोण आहेत पंतप्रधानांच्या खासगी सचिव निधी तिवारी?
निधी तिवारी या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत 96 वा क्रमांक मिळविला होता. त्या उत्तरप्रदेशातील वाराणसीतील मेहमूरगंज येथील आहेत. 2016 मध्ये, त्यांना सर्वोत्कृष्ट अधिकारी प्रशिक्षणार्थी म्हणून राजदूत बिमल सन्याल मेमोरियल मेडल आणि सर्वोत्कृष्ट प्रबंधासाठी पदकाने सन्मानित करण्यात आले होते.
निधी तिवारी या 6 जानेवारी 2023 पासून पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून सेवा बजावत आहेत. 2022 मध्ये त्या पंतप्रधान कार्यालयात अवर सचिव म्हणून रुजू झाल्या. यापूर्वी परराष्ट्र मंत्रालयात तिवारी यांनी नि:शस्त्रीकरण आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा व्यवहार विभागात काम केले होते. त्यांनी तीन वर्षे पंतप्रधान कार्यालयात काम केले आहे.
2013 मध्ये नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होण्यापूर्वी, त्या सहाय्यक आयुक्त (वाणिज्यिक कर), वाराणसी म्हणून कार्यरत होत्या. तसेच नोकरीसह यूपीएससीची तयारी करत होत्या.
पंतप्रधान कार्यालयात, आतापर्यंत त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना अहवाल देणाऱ्या ‘परराष्ट्र आणि सुरक्षा’ वर्टिकलमध्ये उपसचिव म्हणून काम केले आहे. त्यांनी विशेषतः परराष्ट्र व्यवहार, अणुऊर्जा आणि सुरक्षा प्रकरणे तसेच राजस्थान राज्याचा कारभार पाहिला.