ईसा तडवी, प्रतिनिधी
कुरंगी (पाचोरा), 7 एप्रिल : पाचोरा तालुक्यातील कुरंगी येथील विवाहित तरूणाचा पाय घसरल्याने विहिरीत पडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. भूषण पाटील (वय- 32, रा. कुरंगी) असे मृत तरूणाचे नाव असून याप्रकरणी पाचोरा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नेमकी घटना काय? –
मिळालेल्या माहितीनुसार, भूषण पाटील हा नेहमीप्रमाणे कुरूंगी गावातील सोनटेक शिवारातील स्वतःच्या शेतात कामानिमित्त गेला असता विहिरीजवळ पाणी काढण्यासाठी गेला. दरम्यान, विहिरीत पाय घसरल्याने त्याचा दुर्दैवी बुडून मृत्यू झाला. दरम्यान, ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत याबाबतची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचानामा करत तरूणाचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला.
मृत तरूणाचा मृतदेह पाचोरा ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आला असता त्याला मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी पाचोरा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, तरूणाच्या मृत्यूने गावात शोक व्यक्त केला जात असून त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे.
हेही पाहा : ZP School Hol Pachora : 11 लाखांचं बक्षीस जिंकणारी जळगाव जिल्ह्यातील 1 नंबर शाळा | काय आहे खास?