मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांनी विजय मिळवत महाराष्ट्रातील सर्वात युवा आमदार होण्याचा मान मिळवला आहे. यानंतर आज पक्षाच्या वतीने त्यांच्यावर एक मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक आज मुंबईत संपन्न झाली. या बैठकीत विधिमंडळ गटनेते म्हणून जितेंद्र आव्हाड यांना नेमण्यात आले. तर दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे चिरंजीव, युवा आमदार रोहित पाटील यांना पक्षाचे मुख्य प्रतोद बनवण्यात आले आहे.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली. या बैठकीला नवनिर्वाचित आमदारांची हजेरी होती. तर मतदारसंघात नागरी सत्काराचा कार्यक्रम असल्याने पक्षाच्या परवानगीने आमदार संदीप क्षीरसागर गैरहजर होते, असे जयंत पाटील यांनी सांगितले.
यावेळी जयंत पाटील म्हणाले की, विधिमंडळ राष्ट्रवादी गटनेते म्हणून जितेंद्र आव्हाड यांची निवड झाली आहे. त्याचबरोबर पक्षाचे विधानसभेतील मुख्य प्रतोद रोहित आर. आर. पाटील यांची निवड करण्यात आली. त्यांना जोडून सहप्रतोद उत्तम जानकर यांची निवड करण्यात आली आहे. तसेच विधिमंडळ पक्षनेतेपदाची निवड करण्यासाठी अधिवेशन काळात बैठक होईल. त्यावेळी त्याबद्दलचा अंतिम निर्णय घेऊ, असे त्यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीत रोहित पाटील यांचा जोरदार विजय –
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत यावेळी सांगली जिल्ह्यातील तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघात रोहित पाटील विरुद्ध संजयकाका पाटील अशी लढत पाहायला मिळाली. या दमदार लढाईत रोहित पाटील यांनी जोरदार विजय प्राप्त करत ते आता महाराष्ट्रातील युवा आमदार बनले आहेत. रोहित पाटील हे दिवंगत नेते माजी गृहमंत्री आर. आर पाटील यांचे चिरंजीव आहेत. या सर्व अर्थाने रोहित पाटील यांच्यासाठी ही लढाई अतिशय प्रतिष्ठेची झाली होती.
या निवडणुकीत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवारी दिली होती. अगदी वयाच्या 25 व्या वर्षी त्यांनी ही उमेदवारी मिळवली आणि मिळालेल्या या संधीचे सोने करत त्यांनी तब्बल 27 हजारांच्या लीडने अजित पवार गटाचे उमेदवार संजयकाका पाटील यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे. यानंतर आता युवा आमदार रोहित पवार यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी देत त्यांना शरद पवार गटाचे मुख्य प्रतोद बनवले आहे.
हेही वाचा – श्रीकांत शिंदे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होणार का?, एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितले