चोपडा, 3 एप्रिल : चोपडा तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. चोपडा तालुक्यातील दोंदवाडे येथील दोन चिमुरड्यांचा तापी नदीपात्रामध्ये बुडून मृत्यू झाल्याची दुर्दुवी घटना आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. मनीषा परशुराम कोटे (पावरा) (वय 6) व बाजीगर गाठीराम पावरा (7) असे मृत मुलगी आणि मुलाची नावे आहेत.
काय आहे संपुर्ण बातमी?
दोंदवाडे गावात या चिमुरड्यांचे वडील सालगडी म्हणून काम करतात. दरम्यान, आज दुपारी चार वाजेच्या सुमारास ही चिमुकले मुले गावाच्या तापी नदीच्या पात्राकडे खेळत होती. गूळ मध्यम प्रकल्पातून तापी नदीत पाणी सोडल्याने नदीला पाणी होते. दरम्यान, सायंकाळी उशीरापर्यंत दोघी मुले दिसत नाहीत म्हणून गावात शोधाशोध केली.
बुडालेल्या अवस्थेत आढळले –
गावकऱ्यांनी तापी नदीकडे धाव घेतली असता या पाण्यात दोघेही मुले सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास नदीपात्रात बुडालेल्या अवस्थेत गावकऱ्यांना आढळले. सामाजिक कार्यकर्ते मनोज पाटील, गजानन कोळी, प्रदीप सपकाळे, जगदीश पाटील, पोलिस पाटील नितीन पाटील आदींनी त्यांना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.