ईसा तडवी, प्रतिनिधी
गोराडखेडा, 4 जानेवारी : पाचोरा तालुक्यातील गोरडखेडा या गावाजवळ भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पाचोऱ्याकडून जळगावकडे जाणाऱ्या स्विफ्ट कारने (गाडी क्र. MH 14 CC 9276 ) गोराडखेडा गावाजवळ बसस्थानक परिसरात असणाऱ्यांना 4 जणांना मागून जोरदार धडक दिल्याने 2 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत. हा अपघात 4 जानेवारी रोजी सायंकाळी घडला. दरम्यान, या अपघातात पोलिसांनी पाचही जणांना ताब्यात घेतले आहे.
काय संपूर्ण बातमी? –
मिळालेल्या माहितीनुसार, पाचोऱ्याकडून जळगावकडे पाच तरूण स्विफ्ट कारमध्ये भरधाव वेगाने जात होते. दरम्यान, गोराडखेडा या गावातील बसस्थानक परिसरातून सायकलीने जात असलेल्या मृतांमध्ये सुभाष पाटील यांना तर पीके शिंदे महाविद्यालयातून सायकलीने पाचोरा शहरातून गोराडखेड्याकडे येणाऱ्या दोन शालेय विद्यार्थींना तर दुचाकीस्वार परशुराम पाटील यांना या स्विफ्ट कारने मागून जोरदार धडक दिली. दरम्यान, या धडकेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर दोन जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सुभाष पाटील (60) यांचा तर दुर्गा पवार (15) या शाळकरी मुलीचा समावेश आहे. जखमींमध्ये परशुराम पाटील यांना जळगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर ऋतुजा भोईटे (15) या विद्यार्थीनीला पाचोरा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कारचालक मद्याधुंद अवस्थेत –
दरम्यान, या लाल रंगाच्या स्विफ्ट कारमध्ये चार ते पाच जण असल्याची माहिती मिळाली. तसेच हे दारू प्यायले होते, असेही गावकऱ्यांनी सांगितले. या सर्वांना पाचोरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
घटनास्थळी तणाव –
स्विफ्ट कारने दिलेल्या धडकेत 2 जणांचा जागीच मृत्यू झाल्याच्या या घटनेनंतर घटनास्थळी तणाव निर्माण झाला होता. तसेच मोठ्या प्रमाणात नागरिकांची घटनास्थळी गर्दी झाली होती. यावेळी संतप्त जमावाने कार जाळून टाकली, अशी माहिती मिळाली. दरम्यान, या घटनेचा तपास पाचोरा पोलीस करत असून पोलिसांनी शांततेचे आवाहन केले आहे.
परिवारावर दुःखाचा डोंगर –
दरम्यान, या अपघातात ज्या व्यक्तीचा जागेवर मृत्यू झाला, त्यांच्या भावाचे कालच निधन झाले होते. कुटुंबातील एका व्यक्तीच्या निधनावर अंत्यसंस्कार झाल्याच्या दुसऱ्याच दिवशीच त्या कुटुंबातील एका सदस्याचा अपघाती निधन झाल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
केंद्र सरकारचा कायदा योग्यच –
या अपघातामध्ये जी मुलगी जखमी झाली आहे, तिच्या पित्याने सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजसोबत बोलताना सांगितले की, या अपघातामध्ये माझ्या मुलगीही जखमी झाली असून तिच्या हाताला दुखापत झाली आहे. केंद्र सरकारने जो नवीन मोटर वाहन कायदा आहे, तो योग्यच आहेत. त्यामुळे तो कायदा रद्द करु नये, ज्यामुळे अशा दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांना योग्य ती शिक्षा होईल आणि अशाप्रकारचे अपघात होणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.