मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यातील महायुतीला मोठा फायदा झाला आणि या योजनेमुळे महायुतीला विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक असे यश मिळाल्याचे बोलले जात आहे. मात्र, यासोबत आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणाच्या पानीपतमध्ये 9 डिसेंबर रोजी विमा सखी योजना लॉन्च केली. नेमकी ही योजना काय आहे, या योजनेच्या माध्यमातून महिलांना काय फायदा होणार आहे, यासाठी पात्रता काय आहे, कुठली कागदपत्रे हवी आहेत, अर्ज कसा करावा, हे सर्व आपण जाणून घेणार आहोत.
काय आहे विमा सखी योजना –
विमा सखी योजनेचा उद्देश महिलांना विमा एजंट म्हणून स्वावलंबी बनवणे आणि त्यांना पैशाशी संबंधित गोष्टी शिकवणे हा आहे. या योजनेंतर्गत महिलांना विमा पॉलिसी विकण्याचे प्रशिक्षण दिले जाईल. यामुळे त्यांचे उत्पन्न वाढेल आणि त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल.
भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) च्या या योजनेचा उद्देश 18 ते 70 वयोगटातील 10वी उत्तीर्ण महिलांना सक्षम करणे आहे. सुशिक्षित महिलांसाठी ही एलआयसी विमा सखी योजना सुरू करण्यात आली आहे. 10वी उत्तीर्ण महिला विमा सखी योजनेसाठी पात्र आहेत. 18 ते 70 वर्षे दरम्यान वय असलेल्या महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात. या एलआयसी योजनेचा भाग बनणाऱ्या महिलांना ‘विमा सखी’ असे नाव दिले जाईल.
या योजनेच्या अंतर्गत सामान्य लोकांची आर्थिक समज वाढवण्यासाठी आणि विम्याची गरज समजावून सांगण्यासाठी महिलांना आधी 3 वर्षे प्रशिक्षण दिले जाईल. या प्रशिक्षणादरम्यान या महिलांना काही ठराविक रक्कमही मिळणार आहे. 3 वर्षांच्या प्रशिक्षणानंतर या महिला एलआयसीमध्ये विमा एजंट म्हणून काम करू शकतील. तसेच जर विमा सखी पदवीधर असेल तर तिला विकास अधिकारी बनण्याची संधी देखील मिळेल.
विमा सखीला किती पैसे मिळणार –
एलआयसीच्या अधिकृत वेबसाइटवर (https://licindia.in/test2) दिलेल्या माहितीनुसार, या नवीन योजनेअंतर्गत, 10वी उत्तीर्ण विमा सखींना पहिल्या वर्षी 24 पॉलिसी विकण्याचे उद्दिष्ट दिले जाईल, म्हणजे दर महिन्याला दोन विमा पॉलिसी विक्री करावी लागेल.
यामध्ये पहिल्या वर्षी बोनस व्यतिरिक्त, कमिशन म्हणून 48 हजार रुपये मिळतील. यामध्ये प्रत्येक महिन्याचा विचार केल्यास 2 एलआयसी पॉलिसीच्या विक्रीवर विमा सखीला कमिशन म्हणून रुपये 4000 मिळतील. पहिल्या वर्षी घेतलेल्या 24 पॉलिसींपैकी 65 टक्के पॉलिसी दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी इक्विटी ठेवाव्या लागतील. तसेच माहितीनुसार, प्रशिक्षणादरम्यान विमा सखींना पहिल्या वर्षी 7000 रुपये, दुसऱ्या वर्षी 6000 रुपये आणि तिसऱ्या वर्षी 5000 रुपये प्रती महिना स्टायपेंड मिळणार आहे.
विमा सखी योजनेसाठी अर्ज कसा करावा
– विमा सखी योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आधी एलआयसीच्या अधिकृत वेबसाइट https://licindia.in/test2 वर जावे.
– यानंतर, खाली दिलेल्या Click here for Bima Sakhi वर क्लिक करावे.
– त्यानंतर तुमचे नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि पत्ता टाकावा.
– तुमचा एलआयसीच्या कोणत्याही एजंट, विकास अधिकारी, कर्मचारी किंवा वैद्यकीय परीक्षकाशी काही संबंध असल्यास, त्याबद्दल माहिती द्यावी.
– यानंतर कॅप्चा कोड टाका आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे हवीत –
– वयाचा पुरावा
– रहिवासी पुरावा
– 10 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र. हे तिन्ही कागदपत्रे महिला उमेदवाराने सेल्फ अटेस्टेड केलेली असावीत. तसेच ही योजना फक्त महिलांसाठीच असून विमा सखी योजनेसाठी अर्ज करताना अपूर्ण किंवा चुकीची माहिती भरल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो, हे लक्षात ठेवावे.
एलआयसीच्या विमा सखी योजनेंतर्गत महिलेची नियुक्ती ही एलआयसीची कर्मचारी म्हणून पगारी नियुक्ती मानली जाणार नाही. या योजनेंतर्गत भरती होणारे लोक महामंडळाचे नियमित कर्मचारी नसतील किंवा त्यांना वेतनही दिले जाणार नाही. हे लोक प्रशिक्षणार्थी आणि सहाय्यक म्हणून काम करतील आणि त्यासाठी त्यांना स्टायपेंड मिळेल.