यवतमाळ, 16 जुलै : एकलव्य फाउंडेशन आणि आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने संयुक्तपणे पथदर्शी प्रकल्प राबविला. यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी समाजातील मुलांना पहिल्यांदाच उच्च शिक्षणासाठी उंच झेप घेता आली आहे. या संयुक्त प्रकल्पाच्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्यातील विविध आदिवासी शासकीय आश्रमशाळांमधील 35 विद्यार्थ्यांनी देशातील प्रतिष्ठित महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळवला आहे.
कुठे मिळवला प्रवेश?
यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासीबहुल पोड, पाड्या, वस्त्यांवर अद्यापही शिक्षणाच्या सुविधा पोहोचल्या नाहीत. तरीही एकलव्य आणि आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून झालेल्या मार्गदर्शनामुळे आदिवासी मुलांनी उच्च शिक्षणाचा आदर्श सर्वच विद्यार्थ्यांसमोर ठेवला आहे. आदिवासी आश्रमशाळेतील या विद्यार्थ्यांनी फर्ग्युसन कॉलेज पुणे, अझीम प्रेमजी विद्यापीठ भोपाळ, गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स ॲण्ड इकॉनॉमिक्स पुणे आणि निर्मला निकेतन कॉलेज ऑफ सोशल वर्क मुंबई यांसारख्या प्रतिष्ठित महाविद्यालयात प्रवेश मिळवला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला अहवाल –
एकलव्य फाउंडेशन आणि आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीने यवतमाळमधील 18 आदिवासी उच्च माध्यमिक आश्रमशाळांसोबत हा प्रकल्प राबविण्यात आला. या प्रकल्पाचा अहवाल नुकताच यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना सादर करण्यात आला. या प्रकल्पात एकलव्य फाउंडेशनने आदिवासी विद्यार्थ्यांना सर्वोच्च शिक्षण संस्थांमध्ये उच्च शिक्षणासाठी तयार करण्यासाठी निवासी करिअर गायडन्स आणि मेन्टॉरिंग ब्रिज कोर्सद्वारे 50 विद्यार्थ्यांसोबत काम केले. या प्रकल्पासाठी प्रशांत चव्हाण, आकाश मोडक, कोमल गोरडे, आकाश सपकाळे यांनी पुढाकार घेतला.
एकलव्य फाउंडेशनचे राजू केंद्रे यांच्यासह जिल्हाधिकारी अमोल येडगे, आदिवासी विकास विभाग पांढरकवडा येथील प्रकल्प अधिकारी याशनी नागराजन यांच्यामुळे 35 विद्यार्थ्यांना देशातील नामांकित संस्थांमध्ये शिक्षण घेण्याची संधी मिळाली आहे. प्रशासनाची अशीच साथ मिळाल्यास आगामी काळात शिक्षणाचा हा यवतमाळ पॅटर्न राज्यात पोहोचेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
शिक्षणाच्या पुरेशा सोयीसुविधा नसल्यामुळे अनेकदा आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना आश्रमशाळांत शिक्षण घेण्याशिवाय पर्याय नसतो. मात्र, प्रतिकूल परिस्थितीत शिकणाऱ्या या विद्यार्थ्यांना एकलव्य फाउंडेशन आणि पांढरकवडा येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने बळ दिले. या दोघांच्या वतीने राबवण्यात आलेल्या पथदर्शी प्रकल्पामुळे या 35 विद्यार्थांना देशातील विविध नामांकित संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रवेश मिळाला आहे. तसेच आणखीही काही विद्यार्थ्यांना दिल्ली विद्यापीठ आणि जेएनयू व इतर केंद्रीय विद्यापीठांच्या निकालांची प्रतीक्षा आहे.
राजू केंद्रे काय म्हणाले?
दरम्यान, या विद्यार्थ्यांच्या निवडीनंतर एकलव्य फाउंडेशनचे संस्थापक आणि चेवेनिंग स्कॉलर राजू केंद्रे यांनी ‘सुवर्ण खान्देश लाईव्ह’ला प्रतिक्रिया दिला. ते म्हणाले की, एकलव्य फाउंडेशनची चळवळ ही सहा वर्षांपूर्वी यवतमाळातून सुरू झाली. या चळवळीला देश, विदेशात मान्यता मिळाली आहे. आतापर्यंत एकलव्यच्या माध्यमातून 1000 विद्यार्थी 60 विविध नामांकित संस्थांमध्ये पोहोचले आहेत. मात्र, आगामी 10 वर्षात असे किमान 20 हजार विद्यार्थी कला, विज्ञान, मीडिया, तसेच विविध विषयातील उच्च शिक्षणाच्या प्रवाहात पोहोचतील, या उद्देशाने एकलव्य ही संस्था काम करतेय. या सर्व प्रक्रियेत विविध शैक्षणिक संस्था, कॉर्पोरेट जगत तसेच प्रशासन याचं सहकार्य लागेल, असे ते म्हणाले.