ईसा तडवी, प्रतिनिधी
सावखेडा (पाचोरा) – पाचोरा तालुक्यातील सावखेडा येथील श्री भैरवनाथ देवस्थान यात्रोत्सवाला उद्या 5 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. श्री भैरवनाथ देवस्थान हे पाचोरा येथील पंचक्रोशीतील लोकदैवत आहे. त्यामुळे भैरवनाथ संस्थान तर्फे यात्रोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
पाचोरा तालुक्यातील बहुळा, खटकाळ आणि उतावळी नदीच्या त्रिवेणी संगमावर श्री क्षेत्र भैरवनाथ देवस्थान हे जागृत देवस्थान आहे. याठिकाणी परंपरेनुसार पौष महिन्यातील प्रत्येक रविवारी हा यात्रोत्सव साजरा होत असतो. या मंदिरात 85 वर्षांचे पुजारी रामचंद्र बाबा हे काम पाहतात. यावर्षी जानेवारी महिन्यातील 5, 12, 19 आणि 26 जानेवारीला हा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.
यात्रोत्सवाला 400 वर्षांची परंपरा –
पाचोरा तालुक्यातील सावखेडा येथील श्री भैरवनाथ देवस्थान यात्रोत्सवाला 400 वर्षांची परंपरा आहे. या यात्रेचे नियोजन हे भैरवनाथ देवस्थान समितीच्या वतीने केले जाते. पौष महिन्याच्या शेवटच्या सोमवारी कुस्त्यांची दंगल होईल आणि त्यानंतर सायंकाळी देवस्थानापासून भैरवनाथ पालखी मिरवणूक काढली जाते.
यात्रेला पंचक्रोशीतील भाविकांची प्रचंड गर्दी –
दरम्यान, सावखेडा येथील यात्रोत्सवाला शनिवारपासूनच सुरुवात होते. यात्रोत्सवा काळात भाविकांची प्रचंड गर्दी याठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे या कालावधीत पाचोरा, जळगाव, जामनेर, चाळीसगाव आगारातून भाविकांसाठी जादा बसची सुविधा पुरवली जाते.






