चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव, 26 मे : राज्यभरातील जास्त तापमान असणाऱ्या जिल्ह्यात जळगाव जिल्हा हा सर्वोच्च असून नागरिकांना उन्हाचा त्रास असह्य झाला आहे. वाढते तापमानाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालयातून मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या आठ दिवसांत जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालयात 50 मृतदेह आढळून आलेले आहेत. तसेच 50 पैकी 16 मृतदेह बेवारस असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, या घटनेने जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयात 50 मृतदेह –
गेल्या आठ दिवसापासून जळगाव जिल्ह्यात विविध कारणांनी मृत पावलेले 50 मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच 50 पैकी 16 मृतदेह हे बेवारस असल्याचे सांगण्यात येत आहे. या सगळ्या मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या रूग्णांना जीएमसीमध्ये दाखल केल्यानंतर उन्हाच्या तीव्रतेने हे रूग्ण मृत पावले असल्याचा अंदाज वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.
शवविच्छेदन अहवालात काय आहे माहिती? –
जळगाव जिल्ह्याच्या विविध भागात आढळून आलेले हे सर्व मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शवागृहात दाखल करण्यात आली आहेत. या सर्व मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. विविध आजारांनी ग्रस्त असलेले आणि रोगप्रतिकार क्षमता कमी झाल्याने या सर्व व्यक्तींचा उन्हाच्या तीव्रतेने मृत्यू झाल्याची बाब शवविच्छेदन अहवालातून समोर आली आहे.
जीएम फाउंडेशनच्या माध्यमातून अंत्यसंस्कार –
प्राप्त झालेल्या माहितीनुसार, या सर्व मृतदेहांवर मंत्री गिरीश महाजन यांच्या जीएम फाउंडेशनच्या माध्यमातून अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्याचबरोबर रस्त्यावर असलेल्या बेवारस नागरिकांसाठी सुरक्षित ठिकाणी निवास व्यवस्था करण्यात येणार असल्याचेही सांगितले जात आहे.
हेही वाचा : रामदेववाडी अपघात प्रकरणी मोठी अपडेट, तिसऱ्या आरोपीलाही 27 मेर्यंत पोलीस कोठडी