मिलिंद वाणी, प्रतिनिधी
चोपडा, 10 नोव्हेंबर : यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी चोपडा विधानसभा मतदारसंघांमध्ये आज 10 नोव्हेंबरपासून गृह मतदानाला सुरुवात होत आहे. या प्रक्रियेच्या माध्यमातून चोपडा विधानसभा मतदारसंघातील 70 मतदारांना त्यांच्या मतदानाचा अधिकार बजावता यावा, यासाठी प्रशासन थेट त्या मतदारांच्या घरी जाऊन होम वोटिंग करवून घेणार आहे. ही सर्व प्रक्रिया अतिशय पारदर्शक आणि इन कॅमेरा राबवली जाणार आहे. 85 वर्षापेक्षा जास्त वयाचे 56 मतदार आणि दीर्घ आजार किंवा दिव्यांग 16 अशा कारणांमुळे मतदान न करू शकणाऱ्या 70 मतदारांना गृह मतदानाद्वारे आपल्या मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.
गृह मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी यासाठी चोपडा विधानसभा मतदारसंघ अंतर्गत पाच पथकांचे नेमणूक करण्यात आली आहे. सदर पथकातील कर्मचाऱ्यांना दिनांक सात नोव्हेंबर रोजी प्रशिक्षण देण्यात आले आहे. शिवाय या पथकांसोबत पोलीस कर्मचारी व्हिडिओ फोटोग्राफर आणि अधिकारी वर्ग देखील उपस्थित राहणार आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोळे,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्त करण्यात आलेल्या पथकांनी यासाठी जय्यत तयारी केली आहे.