जळगाव, 11 ऑक्टोबर : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे मुख्यमंत्री लाडकी बहिण योजन लाभार्थी सन्मान सोहळा व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवज्योती अभियानांर्गत महिला बचत गटांच्या सदस्यांचा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. दरम्यान, या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अनुपस्थिती राहिली आहे. असे असताना आज त्यांची मुंबईत पत्रकार परिषद पार पडणार असून त्याठिकाणी ते मोठी घोषणा करणार असल्याचे बोलले जात आहे.
अमळनेर आणि जामनेरातील कार्यक्रमांना अनुपस्थिती –
अमळनेरात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजन लाभार्थी सन्मान सोहळ्याचे आज आयोजन करण्यात आले. या कार्याक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार होते. तसेच जामनेरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आयोजित केलेल्या कार्यक्रमाला देखील अजित पवार उपस्थिती लावणार होते. तसेच त्यांचा अधिकृत दौरा देखील जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाला होता. मात्र, अमनळनेर तसेच जामनेरातील कार्यक्रमांना न उपस्थित होता अजित पवार मुंबईकडे रवाना झाले.
उपमुख्यमंत्री अजित पवारांची आज संध्याकाळी मुंबईत पत्रकार परिषद –
उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आज सायंकाळी 6.30 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. एमसीए (द लाउंज), वानखेडे स्टेडियम येथे या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात ते मोठी घोषणा करणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार काय भूमिका मांडतात आणि नेमकी कोणती मोठी घोषणा करतात? याकडे सर्वांचेच लक्ष लागलंय.
हेही पाहा : महाराष्ट्राच्या नवदुर्गा : मानसिक आरोग्य तज्ज्ञ डॉ. विजयश्री मुठे यांची विशेष मुलाखत