मुंबई, 3 नोव्हेंबर : माझ्या लाडक्या बहिणींना, खास करून भाऊबीजेच्या शुभेच्छा देतो. आता तुम्हाला केवळ वर्षालाच नव्हे तर दर महिन्याला भाऊबीज मिळणार आहे. हा माहेरचा आहेर दर महिन्याला तुम्हाला मिळणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मुंबईतील कुर्ल्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचाराला सुरूवात झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले? –
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरोधकांवर टीका करताना म्हणाले की, आम्ही देणारे आहोत. हे विरोधी पक्षाचे नेते लाडकी बहीण योजना बंद होईल, ही योजना आम्ही बंद करू, असे ते म्हणतात. खोडा घालणाऱ्यांना तुम्ही जोडा दाखवणार की नाही?, या योजनेच्या विरोधात ते हायकोर्टात देखील गेले. मात्र, हायकोर्टाने त्यांना चांगलेच झापले. काँग्रेस आणि महाविकास आघाडीची लोक नागपूर खंडपीठात देखील ही योजना बंद करण्यासाठी गेले. आता तर यांचे सरकार आले तर ही योजना बंद करू, असे हे म्हणत आहेत.
दरम्यान, त्यांना वाटत असेल लाडकी बहिणीला पैसे देणारा गुन्हेगार आहे, तर असे मी असा गुन्हा 10 वेळा करण्यासाठी तयार आहे. तसेच आम्ही लाडक्या बहीण योजनेचे पैसे वाढवू, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
मुंबईतील कुर्ल्यातून प्रचाराचा नारळ फोडला –
राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तसेच 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी अशी प्रमुख लढत होणार आहे. दरम्यान, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील कुर्ला विधानसभा मतदारसंघात सभा घेत प्रचाराचा नारळ फोडला आहे. एकनाथ शिंदे यांनी कुर्ला मतदारसंघात महायुतीचे उमेदवार मंगेश कुडाळकर यांच्यासाठी ही प्रचारसभा घेतली.