ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 6 नोव्हेंबर : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघातून मोठी बातमी समोर आली आहे. निवडणुकीच्या कामात सतत गैरहजर राहणे, निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन न करणे या कारणावरून निवडणूक निर्णय अधिकारी भूषण अहिरे यांच्या आदेशानुसार पाचोरा तालुक्यातील चार शिक्षकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे नेमकं प्रकरण? –
पाचोरा मतदारसंघातील निवडणुकीच्या कामासाठी नेमणूक केलेले चार शिक्षक हे प्रशासनाकडून आयोजित केलेल्या कार्यशाळा तसेच इतर कामांसाठी वारंवार नोटीस बजावूनही हजर झाले नाहीत. तसेच उपस्थित न राहण्याचे कोणतेही कारण त्यांनी नमूद केले नाही. दरम्यान, पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी भूषण अहिरे यांनी या प्रकरणाची दखल घेत त्यांच्या आदेशानुसार चार शिक्षकांववर पाचोरा पोलिसांत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फौजदारी कारवाई सुरू झाली असून या शिक्षकांना वेळोवेळी नोटीसा पाठवूनही त्यांनी त्याचे उत्तर दिले नाही आणि कोणतेही कारण नमूद केले नाही. त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
‘या’ चार शिक्षकांवर गुन्हा दाखल –
निवडणूक नायब तहसीलदार रणजीत पाटील यांच्या फिर्यादीनुसार, रोहित भालचंद्र देसले (जि. प. शाळा बाहेरपुरा, पाचोरा), प्रमोद भिला निकम (आश्रमशाळा, सार्वे बु, प्रा. भ., ता. पाचोरा), इसाई घनश्याम मगन (माध्यमिक शाळा, नेरी, ता. पाचोरा), मनोज रतन पवार (माध्यमिक शाळा, जुवार्डी, ता. भडगाव) या चार कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही पाहा : Video : पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघ : कोण होणार आमदार?, पिंपळगाव हरे. येथील जनतेशी थेट संवाद…