नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर : भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे नुकतेच निवृत्त झाले असून त्यांच्या निवृत्तीनंतर न्यायमूर्ती संजीव खन्ना हे आता भारताचे 51 वे सरन्यायाधीश बनणार आहेत. दरम्यान, आज राष्ट्रपती भवन येथे आयोजित एका समारंभात न्यायमूर्ती संजीव खन्ना शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या न्यायमूर्ती संजीव खन्ना यांना सरन्यायाधीश म्हणून शपथ देणार आहेत. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
न्यायमूर्ती संजीव खन्ना यांचा परिचय –
न्यायमूर्ती संजीव खन्ना यांचा जन्म 14 मे 1960 रोजी दिल्लीमध्ये झाला. त्यांचे वडील न्यायमूर्ती देस राज खन्ना हे देखील न्याय क्षेत्रात कार्यरत होते. तसेच दिल्ली उच्च न्यायालयातून ते सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या आई सरोज खन्ना या दिल्ली युनिव्हर्सिटीच्या लेडी श्रीराम कॉलेजात हिंदीच्या प्राध्यापक होत्या. शालेय शिक्षण त्यांनी दिल्लीतच पूर्ण केले आणि नंतर दिल्ली विद्यापीठाच्या लॉ सेंटर (CLC) मधून कायद्याचे शिक्षण घेत 1983 मध्ये, खन्ना यांनी दिल्ली बार कौन्सिलमध्ये नोंदणी करून आपले वकिलीचे करिअर सुरू केले. दरम्यान, त्यांनी दिल्लीतील तीस हजारी न्यायालय आणि उच्च न्यायालयात विविध प्रकारच्या कायद्यांवर काम केले.
अनेक महत्त्वाच्या प्रकरणांत निर्णय –
दिल्लीचे रहिवासी असलेले संजीव खन्ना हे अनेक महत्त्वपूर्ण न्यायालयीन निर्णय घेणाऱ्या न्यायमूर्तींपैकी एक आहेत. खन्ना यांनी कलम 370 ते अरविंद केजरीवाल यांना जामीन प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावली. यासह सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश या नात्याने ते अनेक ऐतिहासिक निर्णयांचा एक भाग होते. न्यायमूर्ती खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने 26 एप्रिल रोजी ईव्हीएममध्ये फेरफार झाल्याचा संशय निराधार ठरवला आणि जुन्या कागदी मतपत्रिका प्रणालीकडे परत जाण्याची मागणी नाकारली. व्हीव्हीपॅट पडताळणी, निवडणूक बाँड योजना, अनुच्छेद 370 हटविणे तसेच अनुच्छेद 142 अंतर्गत तलाका यासारख्या प्रकरणात देखील त्यांनी निर्णयाक भूमिका बजावलीय.
धनंजय चंद्रचूड निवृत्त –
न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड हे नुकतेच निवृत्त झाले आहेत. 8 नोव्हेंबर 2022 रोजी देशाचे 50 वे सरन्यायाधीश म्हणून त्यांनी शपथ घेतली होती. दरम्यान, या दोन वर्षांच्या त्यांच्या कारकिर्दीत तब्बल 1275 पीठाच्या सुनावणीत सहभाग घेत अनेक मोठे निर्णय घेतले. धनंजय चंद्रचूड यांचे वडील दिवंगत वाय. व्ही. चंद्रचूड हे खील देशाचे सरन्यायाधीश होते.
हेही वाचा : मोठी बातमी! अखेर रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरुन हटवलं, नेमकं काय प्रकरण?