भडगाव : महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची निवडणूक येत्या 20 तारखेला होता आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात मतदान करण्यासाठी प्रशानसाच्या वतीने जनजागृती करण्यात येत आहे. यासोबतच विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक आयोगामार्फत 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी घरी मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये भडगाव तालुक्यातील एका 102 वर्षांच्या आजीबाईंनी मतदानाचा हक्क बजावला. यानंतर पावणेतीन तासांत या आजीबाईंचा मृत्यू झाला.
वयाच्या शंभरीनंतरही मतदान –
या आजीबाईंनी वयाची शंभरी पार केली होती. तसेच त्या 102 वर्षांच्या होत्या. या दरम्यान, गुरुवारी 14 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीसाठी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतर आजीबाईंच्या चेहऱ्यावर समाधान झळकले. पण, काही वेळाने आजींची तब्येत बिघडली. यानंतर त्यांना तत्काळ दवाखान्यात हलविण्याची तयारी सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. आजीबाईंचे हे शेवटचे मतदान ठरले. दुपारी 2.45 वाजेच्या सुमारास त्यांनी या जगाचा निरोप घेतला. यानंतर काल त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
ही घटना जळगाव जिल्ह्याच्या भडगाव तालुक्यातील महिंदळे या गावात घडली. द्वारकाबाई सीताराम भदाणे असे या 102 वर्षांच्या आजीबाईंचे नाव आहे. गुरुवारी 14 तारखेला ही घटना घडली. त्या महिंदळे येथील भाऊसाहेब भदाणे, कैलास भदाणे, प्रकाश भदाणे यांच्या आई तर विकास भदाणे आणि चेतन भदाणे यांच्या आजी होत्या.
पाचोरा भडगाव मतदारसंघाबाबत –
दरम्यान, पाचोरा भडगाव मतदारसंघात एकूण 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यात विद्यमान आमदार किशोर आप्पा पाटील यांच्यासह उद्धव सेनेच्या वैशाली सूर्यवंशी, अपक्ष उमेदवार अमोल शिंदे, माजी आमदार दिलीप वाघ, प्रताप हरी पाटील, यांच्यासह इतर उमेदवारांचा समावेश आहे. यावेळी आमदार किशोर आप्पा पाटील हॅटट्रिक करणार की, मतदारसंघातील जनता नव्या चेहऱ्याला संधी देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही पाहा – पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघ : कोण होणार आमदार?, भडगाव शहरातील थेट जनतेशी संवाद…