इसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा – विधानसभा निवडणुकीला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून जाहीर प्रचाराला आता फक्त तीन दिवस उरले आहे. त्यामुळे सर्वच प्रमुख पक्षांच्या उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात प्रचार केला जात आहे. यातच आता पाचोरा भडगाव विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले असून यासाठी प्रसिद्ध अभिनेते गोविंदा आज पाचोऱ्यात येणार आहेत.
असे आहे कार्यक्रमाचे आयोजन –
पाचोरा भडगाव मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीकडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे. किशोर आप्पा पाटील हे यंदा तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून हॅटट्रिक करण्यासाठी जोरदार प्रचार करत आहेत. मागील 10 वर्षांच्या कार्यकाळात करण्यात आलेल्या विकासकामांची यादी ते मतदारसंघातील जनतेपुढे मांडत आहे. तर त्यांच्यासमोर त्यांच्या चुलतबहीण आणि माजी आमदार दिवंगत आर. ओ. पाटील यांच्या कन्या वैशाली सूर्यवंशी या उद्धवसेनेच्या उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यासोबत आमदार पाटील यांना अपक्ष उमेदवार अमोल शिंदे, माजी आमदार दिलीप वाघ यांचेही आव्हान मानले जात आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या वतीने जोरदार प्रचार केला जात आहे.
यातच आता महायुतीचे उमेदवार आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रचारार्थ सुप्रसिद्ध सिनेअभिनेते गोविंदा यांच्या भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. आज शनिवारी 16 नोव्हेंबर रोजी पाचोरा येथे 3 वाजता तर भडगाव येथे 4 वाजता या प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
असा असेल भव्य रॅलीचा मार्ग –
पाचोरा मार्ग – छत्रपती शिवाजी महाराज चौक – स्टेशन रोड – देशमुख वाडी – पंचमुखी हनुमान चौक – आठवडे बाजार – गांधी चौक – जामनेर रोड – छत्रपती शिवाजी महाराज चौक समाप्ती.
भडगाव मार्ग – डी. एड. कॉलेज – बाळद रोड – छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे – तहसील कार्यालय – मेनरोड – आझाद जौक समाप्ती.
हेही पाहा – पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघ : कोण होणार आमदार?, भडगाव शहरातील थेट जनतेशी संवाद…