जळगाव, 18 नोव्हेंबर : विरोधकांजवळ बोलायला मुद्देच नसल्याने गुलाबराव देवकर हे चाळीसगावचे रहिवाशी असल्याचे ते धरणगावच्या सभेत सांगत होते. अरे तुमच्या छाताडावर उभा राहुन मी 2009 च्या निवडणुकीत जळगाव ग्रामीणमध्ये जिंकलो आहे; मग मी चाळीसगावचा कसा काय, असा प्रश्न माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी उपस्थित केला. तसेच मी अजून हिशोब चुकता करणार आहे, असा इशारा देखील त्यांनी दिला.
महाविकास आघाडीचे जळगाव ग्रामीणमधील उमेदवार गुलाबराव देवकर यांची जाहीर सभा काल 17 नोव्हेंबर रोजी नशिराबाद येथे आयोजित केली होती. त्याप्रसंगी प्रतिस्पर्धी महायुतीच्या उमेदवारावर आगपाखड करताना माजी मंत्री देवकर यांनी जोरदार टीकास्त्र सोडले. तत्पूर्वी, त्यांनी नशिराबाद शहरातून भव्य प्रचार रॅली काढली.
यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, रमेश पाटील, लकी टेलर, प्रा.भाऊसाहेब सोनवणे, माजी जि.प.उपाध्यक्ष जानकीराम पाटील, छावा संघटनेचे भीमराव मराठे, पाळधीचे माजी सरपंच दिलीप पाटील, शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे पंकज महाजन, एजाज मलीक, बरकत अली, कृऊबासचे उपसभापती प्रा.पांडुरंग पाटील, संचालक योगराज सपकाळे, गोकूळ चव्हाण, दिलीप कोळी, डॉ.अरूण पाटील, नानाभाऊ सोनवणे, ‘एनएसयुआय’चे गौरव पाटील आदी उपस्थित होते.
समाजावर मते मागितल्याचा आरोप खोटा –
सभेच्या ठिकाणी बोलताना माजी मंत्री गुलाबराव देवकर म्हणाले की, मी समाजावर मते मागत असल्याचा आरोप विरोधक माझ्यावर करतात. परंतु, एकाही व्यक्तीने सांगावे मी कधी समाजावर मते मागितली. ती माझी संस्कृतीच नाही. एखाद्या नेत्याला मोठे व्हायचे असेल तर, त्याला सर्व समाजाला सोबत घेऊन चालावे लागते. सर्व समाजांचे संघटन व ताकद सोबत असल्याशिवाय कोणीही नेता मोठा होत नसतो.
धरणगावचा उड्डाणपूल बांधल्याचा कायम गर्व –
विरोधक मी धरणगावचा रेल्वे उड्डाणपूल बांधल्याचे वारंवार सांगतो म्हणून माझ्यावर टीका करतात. जो उड्डाणपूल तुम्ही दोन पंचवार्षिकमध्ये बांधू शकला नव्हता, तो मी दोनच वर्षात बांधून दाखवला. त्याचा मला नेहमीच गर्व राहिला आहे आणि राहणार आहे. तुम्ही एकतरी ठोस काम केले का? असेल तर माझ्याकडून एक लाख रूपये घेऊन जा, असेही आव्हान माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराला दिले.
हेही वाचा : पाचोरा तालुक्यातील जोगे फाटा येथे 20 लाख रुपयांची रोकड जप्त, नाकाबंदीदरम्यान पोलिसांची मोठी कारवाई