मुंबई, 30 नोव्हेंबर : विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळाले असतानाही राज्याचा मुख्यमंत्री ठरत नाहीये. असे असताना राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या मूळ गावी म्हणजे साताऱ्यातील दरे येथे गेले आहेत. दरम्यान, यावर शिंदेंच्या शिवसेनेचे संजय शिरसाट यांनी सूचक वक्तव्य केले आहे.
संजय शिरसाट काय म्हणाले? –
एकनाथ शिंदे हे ज्यावेळी आपल्या गावी जातात तेव्हा ते एखादा मोठा निर्णय घेतात. यामुळे ते शनिवारी (आज) मोठा निर्णय घेतील असे सूचक वक्तव्य संजय शिरसाट यांनी केले आहे. एकनाथ शिंदे हे काल सायंकाळी दरेगाव येथे पोहचल्यानंतर शिरसाट यांनी हे वक्तव्य केले आहे.
एकनाथ शिंदे आपल्या गावात –
राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथील दरे येथील आपल्या मूळ गावी काल सायंकाळी पोहचले. एकनाथ शिंदे एक-दोन दिवस गावीच मुक्काम करणार असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे हे मुंबईत आल्यानंतरच महायुतीची बैठक होण्याची शक्यता आहे.
View this post on Instagram
मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस? –
राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड केली जाईल हे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र, अधिकृतपणे त्यांच्या नावाची घोषणेची अजूनही प्रतिक्षा केली जात आहे. फडणवीस यांच्या नावाची घोषणा त्यांची भाजपच्या गटनेतेपदी निवड झाल्यानंतरच केली जाणार असल्याचीही माहिती समोर आली आहे.
हेही वाचा : “…..तर काँग्रेसच्या आमदारांनी राजीनामा द्यावा”, विरोधकांच्या आक्षेपानंतर सुधीर मुनगंटीवार नेमकं काय म्हणाले?