नवी दिल्ली – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्लीत माजी केंद्रीय मंत्री, ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली घेतली. शरद पवारांच्या निवासस्थानी ही भेट झाली. आज शरद पवार यांचा 85 वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अजित पवार यांनी दिल्लीत सहकुटुंब शरद पवार यांची भेट घेतली. दरम्यान, या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे याबाबत अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना भेटीत काय घडलं याबाबत माहिती दिली.
भेटीत काय चर्चा झाली –
शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, आज साहेबांचा वाढदिवस आहे. उद्या काकींचा वाढदिवस आहे. त्यामुळे त्या दोघांचं दर्शन घेण्याकरता आम्ही याठिकाणी आलेलो होतो. दर्शन घेतलं. चहापाणी झालं. इतर वेगवेगळ्या इकडे काय चाललंय, तिकडे काय चाललंय, परभणीच्या घटनेसंदर्भातल्या विषयांवर चर्चा झाल्या. सामान्य विषयांवर चर्चा झाली. लोकसभा, राज्यसभा का कमी चालली, राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार, राज्यातील अधिवेशन केव्हा आहे, या सर्व नेहमीच्या विषयांवर चर्चा झाली.
मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार –
पुढे बोलताना ते म्हणाले की, पत्रकारांनाही उत्सुकता आहे, महाराष्ट्रात आम्ही तिघेच जण एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री झाले. बाकीच्या 40 लोकांचे मंत्रिमंडळ कधी होणार, कारण 16 तारखेपासून अधिवेशन सुरू होत आहे. त्या अधिवेशनात विधेयके आहेत, इतर कामकाज असते, त्यावेळी त्याची उत्तरे देण्यासाठी त्या त्या विभागाच्या मंत्र्यांची गरज असते. तर मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर शपथविधी हा 14 डिसेंबरला होणार अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आता भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
राजकारणात फक्त टिका टिप्पणी नाही. तर इतरही संबंध असतात. महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्राने कसं राजकारण करायचं, ते शिकवलेलं आहे. त्यापद्धतीने आम्ही काम करतोय, असेही ते म्हणाले. दरम्यान, यावेळी अजित पवार यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे, छगन भुजबळ हेसुद्धा उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून खान्देशपुत्राला मोठी जबाबदारी, कोण आहेत डॉ. रामेश्वर नाईक?