जळगाव – महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री महाजन यांचे पती सुनिल महाजन महानगर पालिकेच्या पाईपलाईन चोरीच्या संदर्भात संशयित म्हणून आहेत. पोलिसांनी त्याचा तपास करावा. जर त्यात दोषी असेल तर त्याला शासन व्हावं. दोषींच्या पाठीशी महाविकास आघाडी राहणार नाही. जळगाव महानगरपालिका म्हणजे भ्रष्टाचाराचं कुरण आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांनी केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
काय म्हणाले एकनाथ खडसे –
काल पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, जळगाव महानगरपालिका म्हणजे भ्रष्टाचाराचं कुरण आहे. एसीबीच्या माध्यमातून नगरविकास विभागाच्या काही अधिकाऱ्यांना अटक केली किंवा काही अधिकाऱ्यांची चौकशी केली. हे हिमनगाचं एक टोक आहे. जर महानगरपालिकेची चौकशी करायला गेलं तर तिथे सर्वच विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार आहे.
जनता त्यामुळे त्रस्त झाली आहे. मात्र, अँटी करप्शनकडे जाण्याचे सहसा कुणी धाडस करत नव्हतं. काही व्यक्तींनी ते धाडस केलं. त्यामुळे एसीबीच्या माध्यमातून काही अधिकाऱ्यांना आता पकडण्यात आले आहे. त्यामुळे महानगर पालिकेच्या सर्व कारभाराची चौकशी केली पाहिजे, अशी माझी मागणी आहे.
मनपामध्ये प्रशासकीय कालखंडात अधिक भ्रष्टाचार झाला. लोकप्रतिनिधी असताना त्याठिकाणी गैरव्यवहार होतोय, असं आपल्याला वाटलं. मात्र, त्यापेक्षा कितीतरी पटीने याठिकाणी घनकचरा प्रकल्प, पाणीपुरवठांच्या योजने संदर्भात चौकशी करायला गेले तर कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार उघडकीस येईल. त्यामुळे महानगरपालिकेची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि यामध्ये जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली.
गुलाबराव देवकरांच्या अजित पवार गटातील प्रवेशावर एकनाथ खडसेंची सावध प्रतिक्रिया; पाहा, VIDEO