चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
नागपूर – महाराष्ट्राचं वक्फ बोर्ड बरखास्त करुन त्याठिकाणी सर्वसमावेशक सदस्य नेमावे, अशी विनंती आमदार अनुप भैय्या अग्रवाल यांनी आज सभागृहात केली. नागपूर येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज औचित्याच्या मुद्द्यावरुन बोलताना त्यांनी ही मागणी केली.
विधानसभेत नेमकं काय म्हणाले आमदार अनुप भैय्या?
यावेळी विधानसभेत बोलताना आमदार अनुप भैय्या अग्रवाल म्हणाले की, मी माझ्या धुळे शहर मतदारसंघात वक्फ बोर्डाच्या नावाखाली होत असलेल्या भूखंडांच्या अतिक्रमणाबाबत लक्ष वेधू इच्छितो. धुळे शहरातील तत्कालीन नगरपालिकेने टाऊन प्लानिंग स्किल 1964 मध्ये भूखंड क्रमांक 57 अ व 57 ब या जागेवर बैलगाडी आणि पोलीस चौकीचे आरक्षण टाकलेले होते.
सदर जागेचे मालक मोहम्मद हाजी यांना तत्कालीन नगरपालिकेने 11 हजार 711 रुपये त्या जागेबद्दल मोबदलाही दिला होता. प्रत्यक्षात महापालिकेने तो भूखंड ताब्यात घेतला. परंतु 2022 मध्ये विकास आराखडा तयार झाला. त्यात 57 अ आणि 57 ब या भूखंडावर हाऊसिंग फॉर अर्बन पुअर (Housing for Urber Poor), असे आरक्षण टाकण्यात आले.
दरम्यान, ऑक्टोबर महिन्यात 2023 मध्ये अचानक त्या भूखंडावर वक्फ बोर्डाचं नाव लावण्यात आलं. मौलवीवाडा मस्जिद ट्रस्टचे नाव लावण्यात आले. त्याच्याआधी 2023 ऑक्टोबरपर्यंत त्या जागेवर महानगरपालिकेचे नाव होते. परंतु 2023 मध्ये त्या जागेवर नाव बदलण्यात आले. हे सर्व त्यावेळचे तत्कालीन माजी आमदार फारूख शाह यांच्या दबावाखाली भूसंपादन अधिकाऱ्याने हे सर्व कृत्य केलेले आहे.
त्याच ऑक्टोबर महिन्यात फारुख शाह यांच्यावर यांच्या आईच्या नावाने साबेराबी शाह यांनी महानगरपालिकेला प्रस्ताव दिला की, यातील जवळपास 9 हजार 500 स्क्वेअर फूट जागा ही आरक्षण बदलून रहवासाचे आरक्षण आम्हाला मिळावी. परंतु महानगरपालिकेने तो प्रस्ताव फेटाळला. परंतु परत त्यांच्या मातोश्रीने परत प्रस्ताव पाठवला. त्यांनी वक्फ बोर्डाकडून त्या जागेचा 30 वर्षांचा करार केला. वक्फ बोर्ड त्यांच्या कायद्याप्रमाणे असे करार करु शकत नाही. तरी असा करार त्याठिकाणी करण्यात आला.
तसेच महापालिकेने ठराव क्रमांक 46 हा दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी या सर्व आरक्षण बदल करुनचा ठराव शासनाला पाठवला, असे म्हणत हा ठराव त्वरित विखंडित व्हावा, अशी मागणी आमदार अनुप भैय्या अग्रवाल यांनी आज विधानसभेत केली.
धुळे शहरात कॉटन मार्केट परिसर आहे. त्याठिकाणी 3300 घरे हे अस्तित्त्वात आहेत. त्या 3300 घरांवर जी जागा सरकारी होती, त्याच्यावरही वक्फ बोर्डाने आपले नाव लावले आहेत. ही गंभीर बाब आहे. धुळे जिल्ह्यात जवळपास 117 जागांवर वक्फ बोर्डाचे नाव लागले आहे. आणि 33 जागांवर वक्फ बोर्डाने 2023 मध्ये नावे लावली आहेत.
महाराष्ट्राचं वक्फ बोर्ड बरखास्त करुन…
ज्याप्रमाणे दोन दिवसांपूर्वी या सभागृहाचे वरिष्ठ सदस्य यांनी सिद्धिविनायक ट्रस्टमध्ये सर्वसमावेशक असे सदस्य असले पाहिजे अशी विनंती केली, त्याचप्रमाणे माझी विनंती आहे की, महाराष्ट्राचं वक्फ बोर्ड बरखास्त करुन त्याठिकाणी सर्वसमावेशक सदस्य नेमावे, अशी विनंती आमदार अनुप भैय्या अग्रवाल यांनी आज सभागृहात केली.