जळगाव – महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेत जळगाव जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या प्रश्नांवरुन दोन ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्या मोठा वाद झाल्याचे पाहायला मिळाले. यावर आज केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांना विचारले असता जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व नेत्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
काय म्हणाल्या मंत्री रक्षा खडसे –
जळगाव येथे माध्यमांशी संवाद साधताना मंत्री रक्षा खडसे त्या म्हणाल्या की, ‘मी कालच दिल्लीवरुन सकाळी आले. आमचं पण अधिवेशन सुरू होतं. आमचेही तिथे अनेक विषय सुरू होते आणि सध्या मी माझ्या मंत्रालयाच्या कार्यक्रमामध्ये व्यस्त आहे. म्हणून महाराष्ट्राच्या विधिमंडळात काय सुरू आहे, याच्याकडे माझं लक्ष नाही. पण प्रार्थना एवढीच आहे की या दोन नेत्यांमधील जो काही विषय आहे, तो लवकरात लवकर संपेल आणि आपल्या जिल्ह्यात विकासाला गती मिळेल.
कारण आमच्या पक्षाचं, महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचं आमचं भाग्य आहे की, आज आम्हाला जिल्ह्याला तीन कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आहेत. माझ्यासह जिल्ह्यात चार मंत्री झालेले आहेत. अपेक्षा इतकीच आहे की, आमच्या माध्यमातून जास्तीत जास्त विकासाचे कामं आपल्या जिल्ह्यात झाले पाहिजेत. लोकांच्या ज्या काही आमच्याकडून अपेक्षा आहेत त्या आम्हाला पूर्ण करता आल्या पाहिजेत म्हणून त्याकडे आपण ज सर्वांनी लक्ष दिलं तर लोकं आपल्याकडून समाधानी राहतील’.
मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यातील वाद सर्वांना माहिती आहेत. मात्र, परवा विधानपरिषदेत गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्याकडे निर्देश करत सदरे नावाच्या पीआयने आत्महत्या कुणामुळे केली हे स्पष्ट करण्याची मागणी केली. तर वाळू माफिया, अवैध उत्खनन केल्याचा गंभीर आरोप त्यांनी खडसेंवर केला. तर एकनाथ खडसेंनी देखील जळगाव जिल्ह्यात वाळू उपसा आणि अवैध धंद्यांचा मुद्दा उपस्थित केला होता. यानंतर आता केंद्रीय मंत्री रक्षा खडसे या मुद्द्यावर भाष्य करत जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व नेत्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे,’ अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.