वर्धा, 8 फेब्रुवारी : 96 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन वर्धा येथे नुकतेच पार पडले. यावेळी मराठी भाषा संवर्धनासाठी सक्रिय असणाऱ्या आयएसओ नामांकित “साहित्यसंपदा” कं. तर्फे मराठीसाठी सातत्याने कार्यरत राहणाऱ्या व्यक्ती आणि संमेलनातील विविध कट्ट्यांवरील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
गेले अनेक वर्ष कवीकट्टाच्या माध्यमातून सातत्याने नवोदितांना हक्काचे व्यासपीठ मिळत आहे. आजपर्यंत हजारो कवी कवयित्रींना मार्गदर्शन करणाऱ्या आणि हा कवीकट्टा सातत्याने यशस्वीपणे पार पडणाऱ्या ज्येष्ठ कवी गीतकार राजन लाखे आणि कविकट्टा उपसमन्वयक प्रसाद देशपांडे ह्यांचा सन्मान ऋजुता तायडे (दिग्रस) निर्मित “मराठी भाषा चिन्ह” देऊन पार पडला.
याप्रसंगी संपूर्ण कविकट्टा टीम आणि विदर्भ मराठी साहित्यसंघाचे देखील आभार मानण्यात आले. कविकट्ट्यावर महाराष्ट्रातील विविध भागांतील कवींनी सहभाग घेतला. त्याअंतर्गत विनया प्रदिप सावंत (मुंबई), हनुमंत देशमुख (पुणे), श्वेता लांडे (कोल्हापूर ), सरावा कादंबरीकार किसन वराडे (कल्याण), कल्पना मापुस्कर (मुंबई), अनघा सोनखासकर (अकोट) आणि इतर कवींनी आपल्या कविता सादर करून श्रोत्यांची वाहवा मिळवली.
वरिष्ठ पत्रकार विशाल मुंदडा हेदेखील यावेळी उपस्थित होते. सुप्रिसद्ध गझलकार प्रशांत वैद्य आणि इतर गझल कट्टा समन्वयक यांनाही गझलकट्ट्यावर गौरविण्यात आले. तसेच या सन्मान सोहळ्यात गझलकार मंजुळ चौधरी (शिर्डी), गझलकार कविता झुंझारराव (दहिसर) उपस्थित होते.
याप्रसंगी साहित्यसंपदा प्रकाशनातर्फे प्रमोद नारायणे लिखित “बाताड्या थापाड्या” या बालकाव्य संग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ कवी दुर्गेश सोनार ह्यांच्या हस्ते 96वे अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये करण्यात आले. लहान मुलांमध्ये वाचन संस्कृतीची आवड निर्माण करण्यासाठी सकस बालसाहित्याची निर्मिती आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त करताना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
साहित्यसंपदा संस्थापक वैभव धनावडे ह्यांनी सृजन समाज निर्मिती प्रक्रियेमध्ये मुलांचा मोठा सहभाग असून लहान वयातच वैचारिक स्तर मुलांचा उंचावण्यास पुस्तकांची मदत होते, असे सांगून पालकांनी मुलांना पुस्तके विकत घेऊन द्यावीत आणि वाचन चळवळीस हातभार लावावा, असे आवाहन उपस्थितांना केले.
प्रमोद नारायणे यांनी आपल्या बालकवितांच्या माध्यमातून मुलांना त्यांचे भावविश्व उलगडता येईल आणि सदर पुस्तक अंगणवाडीमधील मुलांच्या अभ्यास क्रमास उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन केले. महाराष्ट्रातील सर्व जिल्हा ग्रंथालये यांस लवकरच सदर पुस्तकाच्या प्रति विनामूल्य उपलब्ध करण्यात येतील, असे जाहीर करण्यात आले.
साहित्य संपदातर्फे इकिगाई पुस्तकाचे मराठी अनुवाद करणाऱ्या प्रसाद ढापरे यांची सदिच्छा भेट घेण्यात येऊन साहित्यिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या अलक (अति लघुकथा) या साहित्य प्रकाराचे निर्माते राजेंद्र वैशंपायन यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. अल्क ह्या साहित्यप्रकाची वैशिष्ट्यता, नियम, स्वरूप ,बांधणी आणि इतर बाबींवर मार्गदर्शन लाभले.
परिवर्तन शिक्षण संस्थेचे, ज्ञानामृत माध्यमिक विद्यालय, अंबरनाथ आणि साहित्यसंपदा यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानामृत विद्यालय, अंबरनाथ येथे मराठी भाषा दिनानिमित्त दिनांक 27 फेब्रुवारी 23 रोजी बालसाहित्यसंमेलन पार पडेल, असे साहित्यसंपदातर्फे जाहीर करण्यात आले. हे संमेलन सर्व शाळांसाठी खुले असून अधिक माहिती आणि नोंदणीसाठी 9930080375 क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.