अमरावती, 9 फेब्रुवारी : पत्रकारितेच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रामाणिकता, परिश्रम आणि प्रतिभा या तीन बाबींचा अंगीकार करावा. सकारात्मक विचारातूनच अनेक नवीन संधी येणाऱ्या काळात उपलब्ध होतात. त्यामुळे विद्यार्थांनी या क्षेत्रात आत्मविश्वासाने यावे, असे मत जेष्ठ पत्रकार आणि पुढारी मराठी वृत्त वाहिनीचे वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास भोईटे यांनी व्यक्त केले.
भारतीय जनसंचार संस्थानच्या अमरावती विद्यापीठ परिसरातील पश्चिम क्षेत्रीय केंद्रात आज दुपारी 3 वाजता विशेष व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून तुळशीदास भोईटे यांनी ‘इलेक्ट्रॉनिक माध्यमात रोजगाराच्या संधी’ या विषयावर आपले विचार मांडले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष क्षेत्रीय संचालक प्रा.(डॉ.) वीरेंद्र भारती होते. यावेळी विचारमंचावर वृत्त वाहिनीचे प्रमुख सल्लागार सचिन परब, विनायक पाचलग, इनपुट एडिटर विठोबा सावंत यांचे सह प्रा. अनिल जाधव, डॉ. राजेश कुशवाहा, डॉ. विनोद निताळे, डॉ. आशिष दुबे उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना तुळशीदास भोईटे म्हणाले, आपल्यातील संकोच दूर करा आणि आत्मविश्वासाने सामोरे जा. तुमच्यातील आत्मविश्वास हाच तुमच्या यशाचा पासवर्ड आहे. फक्त विचार करून चालणार नाही तर तो कृतीत सुद्धा आणणे गरजेचा आहे.
आपल्याला माहिती असणारी माहिती खरी असते, असं नाही, जे आपल्याला माहिती नाही तेही खरं असू शकतं; त्याला शोधून लोकांसमोर आणणं हीच खरी पत्रकारिता आहे. टेक्नॉलॉजीला मित्र मानून तिचा वापर चांगल्या कामासाठी करा. तुमच्यातील कौशल्य विकसित करून स्वतःला सिद्ध करा, असा सल्ला देखील त्यांनी यावेळी विद्यार्थाना दिला. याप्रसंगी त्यांनी डिजीटल डेटॉक्स, मिस इन्फॉर्मेशन आणि डिफिट व्हिडिओ याबद्दलही विद्यार्थांना सविस्तर मार्गदर्शन केले.
हेही वाचा – “नकारात्मक भावना अपयशाचे लक्षण तर सकारात्मकता हाच…” – संपादक नानक आहुजा
तर अध्यक्षीय मनोगतात क्षेत्रीय संचालक प्रा. (डॉ.) वीरेंद्र कुमार भारती म्हणाले, इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या विकासामुळे रोजगाराच्या अधिकाधिक संधी निर्माण होत आहेत. इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या बदलत्या स्वरूपासह, आयआयएमसीने इलेक्ट्रॉनिक माध्यमांची सध्याची मागणी आणि गरज लक्षात घेऊन अभ्यासक्रम तयार केला आहे. आयआयएमसीचे विद्यार्थी पत्रकारिता जगतात आपली महत्त्वाची भूमिका बजावू शकतील, अशा पद्धतीने संस्थेत अध्यापन-प्रशिक्षण दिले जात आहे, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, सुरुवातीला मराठी पत्रकारितेच्या विद्यार्थांनी काढलेल्या प्रायोगिक वृत्तपत्रांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अनिल जाधव यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. विनोद निताळे यांनी तर स्वागत डॉ. राजेश कुशवाहा यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकीता चांडक, कलाश्री नाकाडे व काजल जयस्वाल या विद्यार्थिनींनी केले. तसेच आभार डॉ. आशिष दुबे यांनी मानले. यावेळी मराठी, हिंदी आणि इंग्रजी पदव्यूत्तर पत्रकारिता पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसह संजय पाखोडे, राजेश झोलेकर, कोमल इंगळे, नुरूझुमा शेख, भूषण मोहोकार, संजय घरडे, आदर वानखेडे उपस्थित होते.