सुनिल माळी, प्रतिनिधी
पारोळा, 15 जानेवारी : राष्ट्रीय महामार्ग क्र.6 वर सबगव्हाण टोल हा गेल्या 5 महिन्यांपासून सुरू झाला आहे. यामुळे पारोळा शहरासह सभोवतालील खेडे गावांतील लहान-मोठ्या वाहनधारकांचा खिशाला कैची लागली आहे. दैनंदिन प्रवास करणारे शासकीय, खाजगी कर्मचारी, आपला उदरनिर्वाह भागवणारे व्यावसायिक यांसह या महामार्गाने पारोळा तालुक्यातील आपल्या खाजगी वाहनांनी प्रवास करणारे नागरिक खुप हैराण झाले होते.
आमदार अमोल पाटील यांनी घेतली समस्येची दखल –
सबगव्हाण टोला हा पारोळ्यापासून अवघ्या 15 किमीच्या आत आहे. अशात धुळे येथए जाण्यासाठी दैनंदिन नागरिकांना टोल अदा करावा लागत होता. दरम्यान, एरंडोल पारोळा मतदारसंघाचे शिवसेना आमदार अमोल पाटील यांनी या समस्येची दखल घेऊन महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून मार्ग काढला आहे.
फक्त 20 रूपये लागणार टोल –
सबगव्हाणच्या टोल संदर्भात दैनंदिन उद्भवणाऱ्या समस्यांसंदर्भात आमदार अमोल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली टोलधारकांसमवेत बैठक पार पडली. या बैठकीत पारोळेकरांना आपला रहिवास पुरावा आधार कार्ड, ड्रायव्हींग लायसन्स दाखवून अवघ्या 20 रूपयांत एका बाजूने टोल अदा करावा लागणार आहे. तसेच हा टोल अदा करतांना सिस्टीमने अगर टोलची पूर्ण रक्कम कापली गेली तर ती देखील रक्कम त्या वाहनधारकास परत करण्यात येईल.
दरम्यान, या निर्णयाने पारोळेकरांना खिशाला लागणारी कैची थांबणार असून वाहनधारकांचा मागणीनुसार आमदार अमोल पाटील यांच्या मध्यस्तीने रहिवास पुरावा दाखवल्यास 20 रूपयांत पारोळेकरांची वाहने सुटणार आहेत. या निर्णयानंतर आमदार अमोल पाटील यांनी टोलधारकांचा सत्कार करत आभार मानले. तसेच उपस्थित वाहन धारकांनी आमदार पाटील यांनी दैनंदिन होणार त्रास मार्गी लावल्याबद्दल त्यांचे सत्कार करत आभार मानले. यावेळी याप्रसंगी तालुकाप्रमुख मधुकर पाटील, शहरप्रमुख अमृतभाऊ चौधरी, राजुदादा परदेशी, जनरल मॅनेजर लतीफ शेख, प्रोजेक्ट मॅनेजर नरेंद्र खैरनार यांचेसह पारोळा तालुक्यातील वाहन धारक उपस्थित होते.
हेही वाचा : Update : वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ; कोर्टाने सुनावली 14 दिवसांची न्यायलयीन अन् ‘मकोका’, आता पुढे काय?