संदीप पाटील, प्रतिनिधी
पारोळा, 23 जानेवारी : पारोळा-एरंडोल विधानसभा मतदारसंघातील अंजनी मध्यम प्रकल्प चतुर्थ सुप्रमा, पद्मालय उपसा सिंचन योजना-2, नदीजोड प्रकल्प याबाबत महत्वपुर्ण चर्चा करून तातडीने प्रशासकीय बाबी पुर्ण करण्यात याव्या, असे निर्देश आमदार अमोल पाटील यांनी दिले.
पारोळा-एरंडोल विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रातील सिंचन क्षेत्रातील प्रकल्प, योजना यांसह विविध महत्वपुर्ण विषयांवर आमदार अमोल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पारोळा येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी त्यांनी मतदारसंघातील अंजनी मध्यम प्रकल्प चतुर्थ सुप्रमा, पद्मालय उपसा सिंचन योजना-2, नदीजोड प्रकल्प याबाबत महत्वपुर्ण चर्चा करून तातडीने प्रशासकीय बाबी पुर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच शेतकऱ्यांचा सिंचनाला कुठेही आळकाठी न आणता प्राधाध्याने शेतकरी-कष्टकरी, माय-बाप जनतेची कामे मार्गी लावा, पाटचारींव्दारे शेती सिंचन व बिगर सिंचनासाठी येणारे पाणी हे दरवर्षी मोठे लाभदायक ठरते, त्यासाठी पाटचाऱ्यांची वेळोवेळी दुरूस्ती करून शेवटच्या घटकाला मुबलक प्रमाणात पाणी कसे उपलब्ध करून देता येईल, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करा, तसेच सिंचन क्षेत्रातील प्रकल्प तात्काळ कार्यान्वित करण्याचा सुचना त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी जळगाव मध्यम प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद पाटील, अंजनी प्रकल्पाचे उपअभियंता आर. टी. पाटील, जळगांव लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गोकुळ महाजन, पद्मालय उपसा सिंचन योजनेचे उपविभागीय अभियंता आरती बेहेरे, जळगांव गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र अग्रवाल, गिरणाचे उपअभियंता एस.पी.चव्हाण यांचेसह शेतकी संघाचे संचालक साहेबरावदादा पाटील, मोरफळ मा. सरपंच नंदु महाजन उपस्थित होते.