अमरावती, 24 फेब्रुवारी : पत्रकारितेचे क्षेत्र आव्हानांनी भरलेले आहे. या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. मात्र, त्या मिळविण्यासाठी आपल्यातील क्षमता आणि कौशल्य ओळखता आली पाहिजे. आपल्या आवडीचे क्षेत्र कोणते आहे ते जाणून प्रयत्न करा यश निश्चित मिळेल, असे मत दैनिक दिव्य मराठीचे निवासी संपादक विजय बुवा यांनी व्यक्त केले.
भारतीय जन संचार संस्थानच्या अमरावती विद्यापीठ परिसरातील पश्चिम क्षेत्रीय केंद्रात ‘संपादक संवाद’ उपक्रमाअंतर्गत काल गुरुवारी दुपारी ३.०० वाजता विशेष व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून विजय बुवा ‘पत्रकारितेतील संधी आणि आव्हाने’ या विषयावर बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष क्षेत्रीय संचालक प्रा. डॉ. वीरेंद्र भारती होते. तर विचारमंचावर दैनिक दिव्य मराठीचे जिल्हा प्रतिनिधी अनुप गाडगे यांच्यासह डिझाइनर अभिषेक श्रीवास्तव, प्रा. अनिल जाधव, डॉ. राजेश कुशवाहा, डॉ. विनोद निताळे, डॉ. आशिष दुबे, प्रभात कुमार उपस्थित होते.
पुढे बोलताना विजय बुवा म्हणाले, आव्हाने आणि संधी वेग वेगळे नसून एकमेकांना पूरक आहेत. जिथे आव्हान असेल तिथे संधी मिळेल. जिथे संधी आहे, तिथे आव्हाने असतील. पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना संधींचा फायदा घेण्याची आणि आव्हानांना तोंड देण्याची आवड असणे आवश्यक आहे. सोशल मीडियामुळे पत्रकारितेपुढे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. ते मनोरंजन आणि माहितीचे साधन आहे, हे आपण सर्वप्रथम समजून घेतले पाहिजे. सोशल मीडियाला बातमीचे साधन मानू नका कारण ते विश्वासार्ह्य माध्यम नाही. विद्यार्थांनी या माध्यमापासून सावध राहावे, असा सल्लादेखील त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला. याप्रसंगी विद्यार्थांनी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून सोशल मीडिया, प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमाशी संबंधित माहिती जाणून घेतली.
अध्यक्षीय मनोगतात क्षेत्रीय संचालक प्रा. डॉ. वीरेंद्र कुमार भारती म्हणाले, फेक न्यूज हे आज पत्रकारितेसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. त्यामुळे समाजासमोर मोठा धोका निर्माण झाला आहे. पत्रकारितेशी संबंधित लोकांनी या संकटाला खंबीरपणे सामोरे जावे. त्याचबरोबर पत्रकारितेचा उपयोग समाजात पसरलेल्या दुष्कृत्ये आणि उणिवा समोर आणण्यासाठी करावा असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
यावेळी सुरुवातीला संत गाडगेबाबा यांच्या जयंती निमित्य मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थांनी काढलेल्या मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील प्रायोगिक वृत्तपत्रांचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अनिल जाधव यांनी केले. तर पाहुण्यांचा परिचय डॉ. विनोद निताळे यांनी करुन दिला.
तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निकिता सपकाळे, दिपाली मोरे, करण मून आणि रुपेश सोनोने यांनी तर आभार डॉ. राजेश कुशवाहा यांनी मानले. यावेळी मराठी, हिंदी आणि इंग्रजी पदव्यूत्तर पत्रकारिता पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसह संजय पाखोडे, कोमल इंगळे, राजेश झोलेकर, नुरूझुमा शेख, अनंत नांदुरकर उपस्थित होते.