छत्रपती संभाजीनगर, 2 फेब्रुवारी : मराठा आरक्षणाच्या आंदोलनावेळी स्वतःची कार पेटवून देणार, शेतकऱ्यांकडून 20 विहिरी खोदण्यासाठी लाच मागितल्यामुळे पंचायत समिती बाहेर 2 लाख रुपये उधळणारे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे हे पुन्हा एकदा त्यांच्या अनोख्या आंदोलनामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी चक्क साडी नेसून जिल्हा परिषदेच्या कार्यालयात अनोख आंदोलन केले आहे. जलजीवन मिशन योजनेचे रखडलेले काम आणि गावात असलेल्या पाण्याच्या समस्येमुळे त्यांनी हे आंदोलन केले आहे.
काय आहे संपुर्ण बातमी? –
छत्रपती संभाजीनगरच्या गेवराई तालुक्यातील पायगा गावचे सरपंच मंगेश साबळे यांनी छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषदेच्या परिसरात डोक्यावर पाण्याचा हंडा घेत साडी नेसत अनोखे आंदोलन केले. गावातील पाणी प्रश्न सुटत नसल्याने थेट साडी नेसून जिल्हा परिषदेत आंदोलन केले. दरम्यान, आपण सरपंच होऊन दोन-अडीच वर्षे झाली तरी देखील गावकऱ्यांचा पाणी प्रश्न आपण सोडवू शकलो नाही. याचे कारण ठेकेदारांनी ते काम केले नाही, अशी प्रतिक्रिया मंगेश साबळे यांनी आंदोलनावेळी दिली आहे. आपण या ठिकाणी निवेदन द्यायला आलो होतो, असेही मंगेश साबळे यांनी यावेळी सांगितले.पाण्याच्या समस्येमुळे आंदोलन –
मंगेश साबळे यांनी सांगितले की, छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषद कार्यालयात आज मी सरपंच म्हणून आलेलो नाही तर माझ्या महिलांचा आवाज म्हणून आलेलो आहे. माझ्या गावातील महिलांना दोन-दोन किमीवरुन पाणी डोक्यावर पाणी आणावे लागते. माझ्या गावात प्यायला देखील पाणी नाही. सुरुवातीला शुद्ध पाणी नव्हते म्हणून मी आडात बसून आंदोलन केले आणि त्या महिलांनी मला मतदान केले. यामुळे मी सरपंच झालो.दरम्यान, आता मी सरपंच होऊन दोन-अडीच वर्षे झाली आणि जलजीवन मिशनचे कामाला सुरुवात व्हायला चार वर्षे झाली पण अजून पूर्ण झालेले नाही. यामुळे माझ्या गावातील महिलांची अवस्था सांगण्यासाठी मी इथे आलो आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुमच्या लाडक्या बहिणी पिण्याच्या पाण्याची वाट बघत असून माझ्या गावातील महिला मला प्रश्न विचारतात की, अजून गावात पाणी का आले नाही?”, असा सवाल मंगेश साबळे यांनी केला.
हेही वाचा : केंद्र सरकारच्या 2025-26 च्या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना काय मिळालं?, वाचा महत्वाचे मुद्दे