अहिल्यानगर, 3 फेब्रुवारी : अहिल्यानगर येथे महाराष्ट्र केसरी 2025 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. दरम्यान, या वर्षीची महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही वादग्रस्त ठरलीय. डबल महाराष्ट्र केसरी असलेल्या शिवराज राक्षे याला अंतिम सामन्यात पंचांनी बाद केल्यानंतर तो चिडला आणि महाराष्ट्र केसरी स्पर्धेत राडा झाला. पंचांनी चुकीचा निर्णय दिल्याचा दावा करत चिडलेल्या शिवराज राक्षे याने पंचांची कॉलर ओढली आणि लाथ मारली. यामुळे मैदानावर गोंधळ झाल्याचे दिसून आले.
पृथ्वीराज मोहोळ ठरला महाराष्ट्र केसरी –
पुणे जिल्ह्यातील मुळशी येखील पृथ्वीराज मोहोळ हा यावर्षीचा महाराष्ट्र केसरी विजेता ठरला आहे. अहिल्यानगर येथे झालेल्या स्पर्धेत सोलापूरच्या महेंद्र गायकवाड याचा पराभव करत त्याने महाराष्ट्र केसरीचा किताब मिळवला आहे. दरम्यान, महाराष्ट्र केसरीचा किताब मिळविण्याचे माझ्या आजोबांचे स्वप्न होते. या किताबासाठीआमच्या तीन पिढ्या लढल्या आहेत. आणि आज त्यांचे स्वप्न पुर्ण केल्याचे मला मोठे समाधान असल्याची प्रतिक्रिया पृथ्वीराज मोहोळ यानी व्यक्त केली.
नेमकं काय घडलं? –
अहिल्यानगरमध्ये आयोजित केलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पृथ्वीराज आणि शिवराज यांच्यात झालेल्या अंतिम लढतीत प्रचंड गोंधळ निर्माण झाला. पृथ्वीराज मोहोळने टाकलेल्या ढाक डावाने शिवराज खाली पडला. यामुळे शिवराज राक्षे चितपट झाला. दरम्यान, माझी पाठ पूर्णपणे टेकलेली नसताना पंचांनी मोहोळला विजयी केले, असा दावा राक्षे याने केला. यानंतर पंचांच्या निर्णयावर राक्षेसह त्याचे प्रशिक्षक तसेच हितचिंतकांनी आक्षेप घेऊन निर्णयाविरोधात तांत्रिक समितीकडे अपिल केले. मात्र, नियमानुसार कुस्ती चितपट झाल्यास त्या निर्णयावरील अपिल स्वीकारले जात नाही आणि यामुळे अंतिम लढतीत पृथ्वीराज मोहोळ विजेता ठरला.
कुस्तीपटू शिवराज राक्षे चिडला –
पृथ्वीराज मोहोळला पंचांनी विजयी केल्यानंतर शिवराज राक्षे पंचांवर प्रचंड चिडला होता. यावेळी त्याने एका पंचांची कॉलर ओढली आणि थेट लाथ मारली. यावेळी अंतिम लढतीच्या निकालानंतर पुन्हा एकदा महेंद्र गायकवाड आणि त्याच्या हितचिंतकांनी गोंधळ घातला.त्यामुळे स्पर्धा काही काळ थांबली होती. दरम्यान, पोलिसांनी लाठीचार्ज करून त्यांना मैदानातून बाहेर काढले.
शिवराज राक्षेसह गायकवाड वर तीन वर्षांची बंदी –
‘डबल महाराष्ट्र केसरी’ शिवराज राक्षे याने अंतिम सामन्यात गोंधळ घातल्याचे सांगत त्याच्यावर महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने कारवाई केली आहे. शिवराज राक्षे याच्यावर आता पुढील तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. यासोबतच महेंद्र गायकवाड याच्यावरही तीन वर्षांची बंदी घालण्यात आली असून या दोन्ही पैलवानांवर 3 वर्षांची निलंबनाची कारवाई ही महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने केली आहे. दरम्यान, कुस्तीगीर परिषदेच्या या निर्णयामुळे त्यांना कोणत्याही कुस्ती स्पर्धेत भाग घेता येणार नसल्याची माहिती राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास कदम यांनी दिली आहे.
राक्षेच्या कुटुंबियांनी केला मॅच फिक्सिंगचा आरोप –
अहिल्यानगरमधील स्पर्धेत पंचांशी गैरवर्तवणूक केल्याचा ठपका ठेवत डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेवर तीन वर्षे कुस्ती खेळण्याची बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, आता शिवराज राक्षेच्या कुटुंबियांनी संताप व्यक्त करत मॅच फिक्सिंगचा आरोप केला असून शिवराजचे निलंबन केले तसे पंचांना सुद्धा शिक्षा करा, अशी मागणी शिवराजच्या आईने केली आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत मॅच फिक्सिंग होते, असा गंभीर आरोप देखील शिवराजच्या वहिनीने केला आहे.