सांगली, 4 फेब्रुवारी : अहिल्यानगर येथे महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी झालेल्या गोंधळामुळे महाराष्ट्र केसरी स्पर्धा वादात आली आहे. शिवराज राक्षेच्याबाबत पंचांनी घेतलेला निर्णय आणि शिवराज राक्षेने पंचांना लाथ घातल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. अशातच डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे.
चंद्रहार पाटील काय म्हणाले? –
2009 साली पंचांच्या निर्णयामुळे मला पराभवाला सामोरे जावे लागले होते. आज तीच परिस्थिती शिवराज राक्षे याच्यावर आली आहे. शिवराज राक्षे याच्यावर ती परिस्थिती आल्यामुळे काका पवार यांना खरं दुःख कळाले आणि शिवराज राक्षे याच्यासह माझ्यावर अन्याय झाल्याचे काका पवार यांनी मान्य केले आहे. म्हणून त्यावेळच्या कुस्तीगीर परिषदेने मान्य करावे की, चंद्रहार पाटील याच्यावर अन्याय झाला आणि त्यावेळेला त्याला हरविण्यात आले.
‘…अन्यथा महाराष्ट्र केसरीच्या दोन्ही गदा परत करणार!-
दरम्यान, कुस्तीगीर परिषदेने हे मान्य केल्यास मला समाधान मिळेल. अन्यथा मला माझ्या महाराष्ट्र केसरीच्या दोन्ही गदांची गरज नाहीये. कुस्तीगीर परिषेदेने माझी अट मान्य केल्यास महाराष्ट्र केसरीच्या दोन्ही गदा परत करणार, असे दोन वेळचा महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी सांगितले आहे.
मातीशी प्रामाणिक राहून गुरूवर निष्ठा ठेवत मी आज या पदापर्यंत पोहोचलो होतो. असे असतानाही खरंतर, हा अन्याय होऊन एका विशिष्ट निर्णयापर्यंत पोहोचलो आहे. जर त्यावेळच्या पंचांच्या कमिटीने माझ्या पराभवाच्या बाबी मान्य केल्या तरच माझ्या मनाला समाधान मिळेल. अन्यथा उद्या किंवा परवा माझ्या महाराष्ट्र केसरीच्या दोन्ही गदा महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेला परत करणार आणि आयुष्यभर कुस्तीची सेवा करणार, असेही चंद्रहार पाटील यांनी सांगितले.
हेही पाहा : Video : विश्वविजेत्या भारतीय महिला खो-खो संघाची कर्णधार प्रियंका इंगळेचा तरुणाईला काय सल्ला?






