जळगाव, 4 जानेवारी : धरती आबा जनजातीय उन्नत ग्राम अभियान योजना अंमलबजावणी व आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांच्या सादरीकरणाबाबत बाबत आढावा बैठक 3 फेब्रुवारी 2025 रोजी जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद विधानसभा सदस्य ( चोपडा-10) चंद्रकांत सोनवणे, मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
देशातील सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आदिवासी समुदाय, आदिवासी बहुल गावे आणि आकांक्षी जिल्ह्यांमधील आदिवासी कुटुंबांसाठी परिपुर्ती व्याप्ती स्विकारून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रीमंडळाने धरती आबा जनजातीय उन्नत ग्राम अभियानास मंजुरी दिली आहे. या योजनेत जळगाव जिल्ह्यातील 15 तालुके व 112 गावांचा समावेश आहे.
या अभियानासाठी आवश्यक निधी केंद्र आणि राज्य सरकारकडून उपलब्ध होणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील टिएसपी व ओटीएसपी क्षेत्रातील आदिवासी समाज ज्या गावांमध्ये किमान 500 पेक्षा जास्त किंवा किमान 50 टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या वास्तव्यास आहे. अशा प्रत्येक गावाचा व त्यातील प्रत्येक आदिवासी कुटूंब व लाभार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीकोनातून लाभ देण्याबाबतची कार्यवाही ही नियोजनबध्द रित्या पुढील 5 वर्षामध्ये करण्यात येणार असून सर्व शासकिय विभागांमार्फत हे सर्व लाभ देण्यात येणार आहेत.
त्याअनुषंगाने, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्यामार्फत जिल्ह्यातील आदिवासी उपयोजना अंतर्गत आदिवासी विकास विभागमार्फत 112 गावांपैकी (टिएसपी) आदिवासी भागातील चोपडा, रावेर व यावल तालुक्यात राबविल्या जाणाऱ्या 41 गावातील विविध योजनांचे सामाजिक-आर्थिक परिणामांचे विश्लेषण सर्वेक्षण करण्यात आले असून, 41 गावांचा विकास आराखडा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांनी तयार केलेला असून जिल्हाधिकारी, जळगाव यांना विद्यापीठाकडून सादर करण्यात येणार आहे.
उर्वरीत 71 गावांचे सर्वेक्षणाचे कामकाज सुरू असल्याबाबत सादरीकरण करतांना अजय पाटील यांनी सांगितले. तसेच ज्या गावांना सामुहिक वनहक्क मंजूर झालेले आहेत अशा 205 गावांपैकी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार, प्राथमिक स्वरूपात अनुसूचित क्षेत्रातील 20 मंजूर सामुहिक वनहक्क गावांचे आराखडे तयार केल्याचे सहाय्यक वनसंरक्षक श्री. हडपे यांनी सादरीकरण केले.
आदिवासी विकास विभागामार्फत जळगाव जिल्ह्यात आदिवासींच्या कल्याणासाठी न्युक्लिअस बजेट योजना व विशेष केंद्रीय सहाय्य योजना सन 2023-24 मधील कार्यवाही सुरू असलेल्या योजना व पुर्ण झालेल्या योजना तसेच सन 2024-25 मध्ये प्रस्तावित केलेल्या योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच जिल्हास्तरीय वनहक्क समितीने मंजूर केलेल्या वैयक्तिक व सामुहिक वनहक्क धारकांचे जिवनमानात व आर्थिक स्थिती सुधारलेबाबत यशोगाथाचे प्रकल्प अधिकारी यांनी अरूण पवार यांनी सादरीकरण केले.
या सादरीकरणातील धरती आबा जनजातीय उन्नत ग्राम अभियान योजनेची अंमलबजावणी करतांना काही महत्वाचे मुद्यांबाबत आयुष प्रसाद, चंद्रकांत सोनवणे, श्री. अंकित यांनी विशेष मोलाचे मार्गदर्शन केले. या आढावा बैठकीस जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अकलादे, सहाय्यक वनसंरक्षक श्री. हडपे, अजय पाटील, सहाय्यक प्रकल्प अधिकारी यावल प्रशांत माहुरे, प्रशांत सोनवणे व आदी. उपस्थित होते.